पंचायत समितीवर महिलाराज

By Admin | Updated: March 15, 2017 02:37 IST2017-03-15T02:37:20+5:302017-03-15T02:37:20+5:30

रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणुका पार पडल्या. १५ पैकी आठ पंचायत समित्यांवर महिला सभापती

Mahilaraj on Panchayat Samiti | पंचायत समितीवर महिलाराज

पंचायत समितीवर महिलाराज

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणुका पार पडल्या. १५ पैकी आठ पंचायत समित्यांवर महिला सभापती विराजमान झाल्या आहेत. अलिबाग पंचायत समितीवर शेकापच्या प्रिया पेढवी सभापती, तर उपसभापतीपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.
सकाळी अकरा वाजता सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अलिबाग तालुक्याचे पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. अलिबाग तालुक्यातील १४ पैकी आठ जागा या शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने काबीज केल्या, तर सहा जागा या काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्या युतीला मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस युती जिंकणार हे स्पष्ट होते.
सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नसल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीने आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते.
शेकापने सभापतीपदासाठी प्रिया पेढवी यांना, तर उपसभापती प्रकाश पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीने अनुक्रमे ताई गडकर आणि उदय काठे यांना निवडणुकीत उभे केले
होते.
शेकापच्या सभापतीपदाच्या उमेदवार प्रिया पेढवी यांच्या उमेदवारीवर आघाडीच्या उमेदवार ताई गडकर यांनी आक्षेप घेतला. प्रिया पेढवी यांच्याकडे अनुसूचित जमातीच्या जातपडताळणीचे प्रमाणपत्र नाही, तसेच त्यांची जात वैधता ही पडताळणी समितीमार्फत फेटाळण्यात येणार असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, असा आक्षेप ताई गडकर यांनी घेतला होता.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नियम १९६२ नुसार तसेच अन्य सुधारणांप्रमाणे उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज केला असेल, त्याबाबतची पोच पावती असेल, तसेच त्याबाबतचे शपथपत्र जोडलेले असले, तरी तो उमेदवार निवडणूक लढवू शकतो. परंतु त्या उमेदवाराने सहा महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याची कायद्यामध्ये तरतूद असल्याचे अलिबागचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी सांगितले.
कायद्यानुसार प्रिया पेढवी यांना निवडणूक लढविता येत असल्याने गडकर यांचा आक्षेप अर्ज फेटाळण्यात असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahilaraj on Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.