महेश माणगावकरचा दबदबा
By Admin | Updated: September 21, 2015 02:40 IST2015-09-21T02:40:27+5:302015-09-21T02:40:27+5:30
भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू आणि आशियाई सांघिक सुवर्णपदक विजेत्या मुंबईकर महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना

महेश माणगावकरचा दबदबा
मुंबई : भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू आणि आशियाई सांघिक सुवर्णपदक विजेत्या मुंबईकर महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४०व्या महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी महिला गटात अव्वल मानांकित उर्वशी जोशीने अपेक्षित विजेतेपद उंचावले.
बॉम्बे जिमखानाच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत महेशने सुरुवातीपासूनच राखलेला धडाका अंतिम सामन्यातही कायम राखला. त्याने या स्पर्धेत आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करताना प्रत्येक खेळाडूला स्क्वॉशचे धडे दिले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या चौथ्या मानांकित रवी दीक्षितने त्याला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. दोन वेळचा ज्युनिअर मलेशियन ओपनचा विजेता आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेचा पहिला भारतीय विजेता ठरलेल्या रवीकडून अटीतटीचा खेळ अपेक्षित होता. परंतु अनुभवामध्ये वरचढ ठरलेल्या महेशने आपला हिसका दाखवताना ११-८, ११-६, ११-२ अशी बाजी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या बाजूला महिलांच्या गटात उर्वशीने द्वितीय मानांकित अॅना अवस्थीचे आव्हान परतावले. पहिल्या गेमपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम ठेवत उर्वशीने अॅनाचा सरळ तीन गेममध्ये ११-५, ११-७, ११-६ असा फडशा पाडला. व्यावसायिक गटामध्ये दिल्लीच्या परमजीत सिंगने बाजी मारीत तामिळनाडूच्या परथीबान अय्यपनला ११-९, ११-६, ८-११, ११-१ असा अनपेक्षित धक्का दिला. मुलांच्या १९ वर्षांखालील गटात तामिळनाडूच्या अग्रमानांकित अभय सिंगने अपेक्षित विजेतेपदाची नोंद करताना प्रणय जैनला ११-४, ११-२, १२-१४, ११-८ असे नमवले. तर मुलींच्या गटामध्येही अग्रमानांकित जुई कलगुटकरने आकांक्षा रावचा ११-२, ११-६, ११-४ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)