महात्मा गांधी उद्यानाचा खेळखंडोबा
By Admin | Updated: September 14, 2015 03:53 IST2015-09-14T03:53:01+5:302015-09-14T03:53:01+5:30
लहान मुलांसाठी उद्यानाची डोंबिवली पश्चिमेत वानवा असतानाच येथील महात्मा गांधी उद्यानात खेळण्याच्या साधनांची मोडतोड झाली आहे.

महात्मा गांधी उद्यानाचा खेळखंडोबा
अनिकेत घमंडी, डोंबिवली
लहान मुलांसाठी उद्यानाची डोंबिवली पश्चिमेत वानवा असतानाच येथील महात्मा गांधी उद्यानात खेळण्याच्या साधनांची मोडतोड झाली आहे. जेथे झुले तेथे चिखलाचे साम्राज्य आहे. त्यातच प्रचंड घाण असल्याने लहानग्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुलांसाठी हे एकमेव उद्यान असून त्याच्या देखभालीची नगरसेवक दिलीप भोईर यांनी जबाबदारी घेतली आहे. परंतु, त्यात ते सपशेल फेल ठरले आहेत.
या ठिकाणी प्रेमीयुगुलांसह उपद्रवींचा अड्डा बनला आहे. त्यामुळे याकडे नागरिक काणाडोळा करतात. याच वॉर्डात महापालिका-रेल्वे यांनी बांधलेला स्कायवॉक आहे. तो उतरतो, त्या ठिकाणी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत वारांगनांचा वावर असतो. रहिवाशांनी अनेकदा याबाबत नगरसेवकाकडे तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनीही कारवाई केली की, त्या रेल्वे हद्दीत जातात, त्यामुळे ही समस्या सुटता सुटलेली नसून नागरिक त्रस्त आहेत. कचराकुंडीमुक्त वॉर्ड झालेला नाही. त्यामुळे ती समस्याही जटील आहे.
सिमेंट काँक्रीटचा रस्ता या ठिकाणी अर्धवट आहे. त्यामुळेही वाहनचालक त्रस्त आहेत. कचराकुंड्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा संचार आहे. रात्री दबा धरून बसलेली ही कुत्री वाहनचालकांसह नागरिकांना त्रास देतात. या ठिकाणी महापालिकेची पु.भा. भावे इमारत असून ती कमकुवत झाली आहे. तशाच अवस्थेत या ठिकाणी महापालिकेच्या काही विभागांचे कामकाज तसेच शाळाही भरवण्यात येते. तेथे पावसाळी शेड बसवली असली तरीही गळतीची समस्या आहेच.
हा परिसर रेल्वे लाइनला समांतर असून त्या ठिकाणी रिक्षाचालकांसह काही वेळेस अन्य वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. ब्रीज जेथे उतरतो, त्या ठिकाणी कचराकुंडीची समस्या होती. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच ती निकाली निघाली. अधिकृत रिक्षा स्टॅण्ड नसल्याने रेल्वे स्थानकाबाहेर वाहने कशीही उभी असतात. त्यावर, नगरसेवकाला अंकुश लावता आलेला नाही. वॉर्डातील काही इमारती रस्त्याच्या खाली गेल्या असून त्या ठिकाणी पाणी निचऱ्याची समस्या उद्भवते.