मोखाड्यात २५६ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत
By Admin | Updated: September 1, 2015 04:27 IST2015-09-01T04:27:46+5:302015-09-01T04:27:46+5:30
मुंबईपासून शंभर किमीवर असणाऱ्या मोखाडा तालुक्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून ७८ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत आहेत

मोखाड्यात २५६ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत
रवींद्र साळवी , मोखाडा
मुंबईपासून शंभर किमीवर असणाऱ्या मोखाडा तालुक्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून ७८ आदिवासी बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. शासन दरवर्षी ही समस्या दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र येथील परिस्थिती पाहता ते पाण्यात गेल्यासारखे ठरत आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत १५ बालकांचा मृत्यू झाल्याने सरकार आहे कुठे, असेच म्हणण्याची पाळी आली आहे.
मोखाडा एकात्मिक बाल विकास कार्यालयांतर्गत येणारी १७८ मुले आणि ५१ मिनी अंगणवाड्यांमध्ये ७८ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर असून ६५८ बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती
लोकमतच्या हाती आली आहे. तसेच हे विदारक चित्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला गेल्या ३ वर्षांपासून स्वतंत्र अधिकारी नाही, तर एकूण १७८ पैकी ५२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नाहीत. यातील १५७ अंगणवाड्यांना पेयजलाची सुविधा नाही. यामुळे कुपोषण रोखण्यासाठीचा कोट्यवधींचा निधी जातो तरी कुठे, असा सवाल विचारला जात आहे.
अंगणवाड्यांमध्ये बालकांचा आहार, स्वच्छता, पेयजल सुविधा, शौचालय आदी बाबी एकात्मिक बालविकास कार्यालयाशी निगडित आहेत. परंतु, हे विभाग मात्र कुपोषण निर्मूलनात अपयशी ठरत असून आदिवासी विभाग, आरोग्य विभाग ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगून हा प्रश्न टोलवत आहेत.
तसेच अंगणवाडी सेविकांचा पगारदेखील वेळेवर होत नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला स्वतंत्र अधिकारी नसल्याने किरकोळ कामासाठी पालघरशी संपर्क साधावा लागतो. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, डॉक्टरांचा अभाव आहे. ही स्थिती बदलणार तरी कधी? (वार्ताहर)