हरवलेला मुलगा दोन वर्षांनी सापडला
By Admin | Updated: November 12, 2015 02:49 IST2015-11-12T02:49:31+5:302015-11-12T02:49:31+5:30
जत्रेसाठी गावी जाण्याचा हट्टाने घर सोडल्याने हरवलेल्या मुलाचा दोन वर्षांनी शोध लागला आहे. कर्नाटकला जाणाऱ्या गाडीऐवजी तो दुसऱ्याच गाडीत बसल्याने हैदराबादला पोचला होता.

हरवलेला मुलगा दोन वर्षांनी सापडला
नवी मुंबई : जत्रेसाठी गावी जाण्याचा हट्टाने घर सोडल्याने हरवलेल्या मुलाचा दोन वर्षांनी शोध लागला आहे. कर्नाटकला जाणाऱ्या गाडीऐवजी तो दुसऱ्याच गाडीत बसल्याने हैदराबादला पोचला होता.
तुर्भे येथील हनुमान नगरमध्ये राहणारा संतोष धोत्रे (१०) सप्टेंबर २०१३ मध्ये हरवला होता. जत्रेसाठी गावी चाललेल्या आजोबांना सोडण्यासाठी तो कुटुंबासोबत तुर्भे नाका येथे आला होता. त्यालाही जत्रेसाठी गावी जायचे होते, मात्र घरच्यांनी पाठवले नव्हते. त्यामुळे आजोबांनाा सोडल्यानंतर घरी जात असताना तो पळून गेला होता. उशीरापर्यंत घरी न आल्यामुळे तो हरवल्याची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलीसांकडे करण्यात आली होती, मात्र त्याचा शोध लागला नव्हता.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्याच्या तपासाला सुरवात केली. यानुसार संतोष धोत्रे नावाचा मुलगा कोणत्या बालसुधारगृहात आहे का, याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान कर्नाटकमधील कुलबर्गी येथील बालसुधारगृहात एक संतोष नावाचा अल्पवयीन मुलगा असून तो मराठी बोलत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक पुष्पलता दिघे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक रुपाली पोळ यांचे पथकाने तिथे जाऊन मुलाची चौकशी केली. शिवाय त्याच्या पालकांशीही भेट घालून दिली असता, तो हरवलेला संतोषच असल्याचे समजले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी हरवलेला संतोष परत मिळाल्याने त्याच्या कुटूंबीयांची दिवाळी खऱ्या अर्थाने सुखद झाली. याबाबत त्यांनी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्यासह दिघे यांच्या संपुर्ण पथकाचे त्यांनी आभार मानले आहेत.
हैदराबादला पोचल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी त्याला तिथल्या बालसुधारगृहात दाखल केले. त्याने आपण कर्नाटकचे असल्याचे सांगितल्यानंतर त्याला कुलबर्गा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. पत्ता माहीत नसल्यामुळे तो तिथेच राहत होता असे पोलीस निरिक्षक पुष्पलता दिघे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)