गेलेले नऊ लाख मिळवण्याच्या प्रयत्नात नऊ लाख गमावले; नेव्ही कर्मचाऱ्याची फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 13, 2024 18:53 IST2024-02-13T18:51:07+5:302024-02-13T18:53:21+5:30
टर्म इन्शुरन्स काढण्याच्या बहाण्याने नेव्ही कर्मचाऱ्याची १० लाख ५९ हजाराची फसवणूक झाली आहे.

गेलेले नऊ लाख मिळवण्याच्या प्रयत्नात नऊ लाख गमावले; नेव्ही कर्मचाऱ्याची फसवणूक
नवी मुंबई: टर्म इन्शुरन्स काढण्याच्या बहाण्याने नेव्ही कर्मचाऱ्याची १० लाख ५९ हजाराची फसवणूक झाली आहे. सुरवातीला दिड लाखाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लुटली गेलेली रक्कम परत मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी अधिक नऊ लाख रुपये गमावले आहेत.
उलवे येथे राहणाऱ्या २९ वर्षीय नेव्ही कर्मचाऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते घरी असताना त्यांना टर्म इंश्युरन्स मध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळवण्याची माहिती देणारा फोन आला होता. त्याला प्रतिसाद देत त्यांनी टर्म इंश्युरन्स काढण्याची तयारी दाखवली होती. यासाठी फोनवरील व्यक्तीने त्यांच्याकडून दिड लाख रुपये ऑनलाईन घेतले होते. मात्र त्यानंतर संबंधिताने संपर्क तोडला असता ज्या खात्यात रक्कम गेली आहे त्या खात्याला जोडलेल्या नंबरवर त्यांनी संपर्क साधला होता.
यावेळी फोनवरील व्यक्तीने सदर बँक खाते एका कंपनीचे असून गुन्हेगाराने पाठवलेली रक्कम तुम्हाला मिळून जाईल असे सांगितले. त्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी त्याने केलेल्या मागणीनुसार नेव्ही कर्मचाऱ्याने तब्बल ९ लाख रुपये ऑनलाईन पाठवले. त्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अज्ञात दोघांवर सायबर पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.