पनवेल शहरावर सीसीटीव्हींची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 00:37 IST2015-12-23T00:37:14+5:302015-12-23T00:37:14+5:30
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

पनवेल शहरावर सीसीटीव्हींची नजर
प्रशांत शेडगे , पनवेल
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पालिका प्रशासनाकडून आर्थिक मंजुरीही देण्यात आली असून यासाठी महत्त्वाची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. निधीची तरतूद झाल्यानंतर स्पर्धात्मक पध्दतीने एजन्सी नियुक्त करून ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
पनवेल शहराची लोकवस्ती कमालीची वाढत आहे. मोठमोठ्या इमारती, व्यापारी संकुल तसेच दुकानांच्या जागेवर शोरूम्स उभे राहिले आहेत. याशिवाय तालुक्यातील अनेक गावांतील लोक याठिकाणी खरेदीसाठी येतात. विविध शासकीय कार्यालये, उरण नाक्यावर असलेली मोठी होलसेल विक्र ेत्यांची बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आहे. याशिवाय शहरात मिश्र लोकवस्ती आहे. तसेच अतिसंवेदनशील धार्मिक स्थळे शहरात आहेत.
वाढत्या लोकवस्तीमुळे गुन्हेगारांचा वावर वाढत चालला आहे. त्याचबरोबर घरफोड्या, सोनसाखळी चोरी, बतावणी करून लुटण्याचे प्रकारही वाढत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खबरदारी घेण्याचा निर्णय पनवेल शहर पोलिसांनी घेतला आहे.
सुरक्षितता व खबरदारीकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पनवेल नगरपालिकेला सादर केला आहे. याबाबत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांनी संबंधित विभागाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरीकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पारित केले. त्यानुसार ६२४ क्र मांकाचा ठराव करून त्याला मंजुरी सुध्दा घेण्यात आली आहे.
मुंबई पुणे मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी चेनस्रॅचिंग प्रकरणातील टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)