खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

By Admin | Updated: May 26, 2016 02:57 IST2016-05-26T02:57:39+5:302016-05-26T02:57:39+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व

'Lokmat' hydroelectric campaign in Kharghar | खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

खारघरमध्ये ‘लोकमत’चे जलमित्र अभियान

कळंबोली : गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व शासनाकडून पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’ने सुध्दा जलमित्र अभियान हाती घेतले असून या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. बुधवारी खारघर येथील नामांकित थ्री स्टार हॉटेलमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांचे पाणी बचतीविषयी प्रबोधन केले.
लोकमत वृत्त समूह सातत्याने सामाजिक विषय हाती घेवून लोकांमध्ये जनजागृती करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात पाणीटंचाई त्याचबरोबर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही शहरात बहुतांशी ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करून नासाडी केली जात आहे. विशेष करून हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात येत आहे. अर्धा ग्लास पाणी हवे असेल तर त्याकरिता संपूर्ण ग्लास पाणी घेवून त्याचा अपव्यय केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने ‘लोकमत’ने विशेष करून हॉटेलमध्ये जलमित्र अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार बुधवारी सायन-पनवेल महामार्गालगत हिरानंदानी संकुलात असलेल्या थ्री स्टार या हॉटेलमध्ये हे अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा, मयूर हरळकर, विश्वनाथ शेट्टी, जुबेर खान उपस्थित होते.
सुरुवातीला हॉटेलमध्ये सेवा पुरविणाऱ्या वेटरना बोलावून पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचरोबर ग्राहकांबरोबर सुध्दा संवाद साधून पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. मी मूळचा नांदेड म्हणजे मराठवाड्यातील असून पाण्याचे महत्त्व काय आहे याची जाणीव मला आहे. कारण या ठिकाणी सातत्याने दुष्काळ पडतो. शालेय जीवनात आम्ही पहाटे उठून दूर जावून बैलगाडीतून पाणी आणत होतो आणि तेच पुरवून पुरवून वापर करत असल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. पाण्याअभावी पैनगंगा धबधबा बंद पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने जे जलमित्र अभियान हाती घेतले त्याबद्दल निलेवाड यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. थ्री स्टारचे व्यवस्थापक रितेश सिन्हा यांनी पाणीबचतीबाबत ‘लोकमत’ने घातलेली साद अतिशय योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही आगामी काळात पाण्याचा अपव्यय करणार नाही अशी ग्वाही देवून वेटर आणि ग्राहकांमध्ये जागृती करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर)

पत्रकाद्वारे प्रबोधन
थ्री स्टार हॉटेलमध्ये ग्राहक आणि वेटर यांना जलमित्र अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर हॉटेलमध्ये भिंतीवर माहिती पत्रक लावण्यात आले. त्याचबरोबर वॉश बेसिन आणि टेबलवर जलबचतीची माहिती देणारे माहिती पत्रक ठेवण्यात आले. हे पत्रक सगळ्यांचे लक्ष आकर्षित करून घेत होते. टेबलवर पिवून उरलेले ग्लासातील पाणी एका भांड्यामध्ये संचय करण्यात आले.

Web Title: 'Lokmat' hydroelectric campaign in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.