गणेशोत्सव स्पर्धेत लोकमान्य सेवा मित्र मंडळ प्रथम
By Admin | Updated: September 11, 2015 01:39 IST2015-09-11T01:39:30+5:302015-09-11T01:39:30+5:30
महापालिकेने गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये ऐरोलीमधील लोकमान्य सेवा मित्र मंडळाचा पहिला क्रमांक आला आहे. सर्व विजेत्या मंडळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

गणेशोत्सव स्पर्धेत लोकमान्य सेवा मित्र मंडळ प्रथम
नवी मुंबई : महापालिकेने गतवर्षी आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये ऐरोलीमधील लोकमान्य सेवा मित्र मंडळाचा पहिला क्रमांक आला आहे. सर्व विजेत्या मंडळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने प्रत्येक वर्षी गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते. गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संदेश देणारे देखावे. उत्सवांचे शांततेमध्ये आयोजन व इतर गोष्टींची पाहणी केली जाते. उत्तम आयोजन करणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात येतो. गुरूवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात गतवर्षीच्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक ऐरोलीतील लोकमान्य सेवा मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक नवयुग उत्सव मित्र मंडळ नेरूळ सेक्टर १०, तृतीय क्रमांक बजरंग तरूण मित्र मंडळ दिघा व उत्तेजनार्थ बक्षीस सानपाडाचा महाराजा सेक्टर १० व सीवूड दारावे मित्र मंडळाला देण्यात आला. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.
शहरातील ४३ खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. खेळाडूंना शिष्यवृत्तीचेही वितरण करण्यात आले. गणेश नाईक यांनी विजेत्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी अजून चांगली कामगिरी करावी असे मत व्यक्त केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.
प्रथमच सर्व नेते एका व्यासपीठावर
गणेश दर्शन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त प्रथमच सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गणेश नाईकांपासून दूर गेल्यानंतर विजय चौगुले प्रथमच त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, एम. के. मढवी या सर्वांना शहरवासीयांनी प्रथमच एका व्यासपीठावर पाहिले. कार्यक्रमात दोन्ही आमदारांना भाषण करण्याची संधी दिली नाही. यामुळे मंदा म्हात्रे यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती.