स्थानिक नगरसेविका विरोधावर ठाम

By Admin | Updated: December 20, 2014 22:44 IST2014-12-20T22:44:30+5:302014-12-20T22:44:30+5:30

कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी लवकरच दिल्ली येथे मार्गस्थ होणार आहेत.

The local corporator is firm on the opposition | स्थानिक नगरसेविका विरोधावर ठाम

स्थानिक नगरसेविका विरोधावर ठाम

कल्याण : कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकारी लवकरच दिल्ली येथे मार्गस्थ होणार आहेत. परंतु, ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबविणार आहे, त्या उंबर्डेतील स्थानिक नगरसेविका पुष्पा भोईरयांनी मात्र दिल्लीला जाण्यास विरोध दर्शविला आहे. स्थानिक नगरसेविकेचा विरोध पाहता प्रस्तावित दिल्ली दौऱ्याचे फलित काय?अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
अन्य महापालिकांप्रमाणे केडीएमसी परिक्षेत्रातही कचरा डंपिंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावा, असे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले असताना याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे. क्षमता संपुष्टात आलेले आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा आणि कचरा उंबर्डे येथील आरक्षित भुखंडावर टाकण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेने घेऊनही आतापर्यंत याची ठोस कार्यवाही झालेली नाही. उंबर्डे येथील स्थानिक ग्रामस्थांचा कचरा डंप करण्यास तीव्र विरोध असताना आता याठिकाणी टाकला जाणारा कचरा जाळून त्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात मागील आठवडयात केडीएमसी मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत वीज निर्मिती प्रकल्प राबविणाऱ्या जिंदाल कंपनीने प्रेझेंटेशन दाखविले होते. दरम्यान केडीएमसीच्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवकांनी उंबर्डे येथे प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने ६० कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे़ असे असताना आता नवीन प्रणाली राबविण्यासाठी दिल्ली वारी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

सर्व पदाधिका-यांचा समावेश
४महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते यांच्यासह सर्वपक्षिय गटनेते असे पदाधिकारी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दिल्लीला मार्गस्थ होणार आहेत.
४उंबर्डे येथे कचरा डंप करण्यास विरोध करणाऱ्या स्थानिक नगरसेविका पुष्पा भोईर यांनाही प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात येणार होते. परंतु, त्यांनीच आता या दौऱ्याला विरोध केला आहे. यासंदर्भातले पत्र त्यांनी महापौर,आयुक्तांना गुरूवारी दिले. हा दौरा कोणाच्या आदेशाने आयोजित केला? त्याला महासभेने मंजूरी दिलेली नाही, त्यामुळे त्यावर विनापरवाना खर्च केल्यास याप्रकरणी न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा ही भोईर यांनी दिला आहे.
४त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत त्यांचा दौऱ्याला होत असलेला विरोध पाहता सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर मिळाला आहे. यासंदर्भात
लोकमतने महापौर कल्याणी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: The local corporator is firm on the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.