विमा योजनेतील कामगारांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: June 20, 2016 02:34 IST2016-06-20T02:34:06+5:302016-06-20T02:34:06+5:30
राज्य विमा कामगार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. असे असतानाही तीन धोकायदाक इमारतींमधील रहिवाशांना चौथ्या

विमा योजनेतील कामगारांचा जीव धोक्यात
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
राज्य विमा कामगार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे. असे असतानाही तीन धोकायदाक इमारतींमधील रहिवाशांना चौथ्या धोकादायक इमारतीमध्ये कोंबून मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याठिकाणच्या सुस्थितीतील इमारतीमध्ये रिक्त घरे असतानाही, केवळ त्या इमारती अधिकाऱ्यांसाठी असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना ताबा देण्यास नाकारले जात आहे.
राज्य कामगार विमा योजनेच्या (कामगार रुग्णालय) वाशी सेक्टर ५ येथील रहिवासी वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. त्याठिकाणच्या ११ पैकी चार इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. या चारही इमारती विमा योजनेच्या फक्त कामगारांच्या वास्तव्यासाठी आहेत. मात्र या चारही इमारतींमध्ये सुमारे सात वर्षांपासून पडझड सुरूच आहे. इमारतीच्या खांबाचे सिमेंट निघून पडलेले आहे, तर भिंतीलाही तडे गेलेले असून अनेक ठिकाणी पडझड देखील झालेली आहे. यामुळे गेली कित्येक वर्षांपासून त्याठिकाणचे रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. सदर इमारतींची एकदाही डागडुजी झालेली नसल्यामुळे मोडकळीस आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र अधिकारी व डॉक्टरांसाठी असलेल्या उर्वरित ७ इमारतींची वेळोवेळी डागडुजी झालेली आहे. त्यामुळे वरिष्ठांच्याच भेदभावामुळे कामगारांच्या चार इमारतींची दुरवस्था झाल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतु शासनच दखल घेत नसल्यामुळे त्यांना रोजच मृत्यूच्या दाढेतून जावे लागत आहे. चारही इमारतींमध्ये प्रत्येकी ४० याप्रमाणे एकूण १६० घरे आहेत. परंतु निवृत्त झालेल्या कामगारांनी, तसेच निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी घरांचा ताबा सोडलेला आहे. यामुळे सद्य:स्थितीला निम्म्याहून अधिक घरे वापरात नाहीत. तर प्रत्येक इमारतीमध्ये किमान १० ते १५ याप्रमाणे चार इमारतींमध्ये एकूण सुमारे ४० ते ४५ कुटुंबेच सद्य:स्थितीला त्याठिकाणी राहत आहेत. इमारत राहण्यायोग्य नसल्याचे रहिवाशांकडून सांगूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नव्हती. अखेर महापालिकेनेच इमारत धोकादायक घोषित केल्यामुळे एकदाची सुटका होणार असे रहिवाशांना वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र झाले उलटेच. चक्क कामगारांच्या कुटुंबीयांना आडातून काढून विहिरीत ढकलण्याचाच प्रकार कामगार विमा योजनेच्या वरिष्ठांकडून सुरू आहे. याठिकाणी चारही इमारतींमध्ये सद्य:स्थितीला राहत असलेल्या सर्वांना स्थलांतर करणे शक्य आहे.
असे असतानाही तीन इमारतींमधील रहिवाशांना धोकादायक असलेल्या चौथ्या इमारतीमध्ये जाण्यासाठी भाग पाडले जात आहे. परंतु ती इमारत देखील धोकादायक असल्यामुळे या स्थलांतराला विमा योजनेच्या कामगारांनी विरोध दर्शवला आहे.
महापालिकेने धोकादायक घोषित केलेल्या चारही इमारतींचे छत कमकुवत असल्यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात छतावर साचणारे पाणी चौथ्या मजल्यावरील घरांमध्ये ठिपकत असते. यंदाचा पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अद्याप त्याठिकाणच्या रहिवाशांची पर्यायी सोय झालेली नाही. यामुळे गंभीर दुर्घटनेची शक्यता असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कामगार रुग्णालयाच्या वाशीतील वसाहतीमध्ये वास्तव्य करणारे काही जण मुलुंडच्या रुग्णालयात काम करणारे देखील आहेत. त्यांना ऐन वेळी मुलुंडला स्थलांतर होण्याच्या सूचना मिळत आहेत.
वरिष्ठांची दहशत
भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कामगारांनी आवाज उठवल्यास इतरत्र बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली. यापूर्वी अनेकांच्या झालेल्या बदल्या अशाच प्रकारातून झालेल्या असल्याचेही कामगारांचे म्हणणे आहे. तर केवळ बदलीच्याच भीतीपोटी मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून सहकुटुंब राहावे लागत आहे.
११ इमारतींपैकी टाईप १ च्या चार इमारती कामगारांसाठी तर टाईप २ च्या चार व ३ च्या तीन इमारती अधिकारी व डॉक्टर यांच्यासाठी राखीव आहेत. अधिकारी व डॉक्टर यांच्यासाठी राखीव असलेल्या ७ इमारतींमध्ये बहुतांश घरे वापरात नाहीत.