पहिल्या नगरपालिकेचा बहुमान मिळू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:56 IST2016-03-19T00:56:51+5:302016-03-19T00:56:51+5:30
पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु आतापर्यंत अधिकृतरीत्या हा बहुमान शहरास मिळाला नाही. पालिकेने यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा

पहिल्या नगरपालिकेचा बहुमान मिळू द्या
नवी मुंबई : पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे. परंतु आतापर्यंत अधिकृतरीत्या हा बहुमान शहरास मिळाला नाही. पालिकेने यासाठी शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे.
राज्यातील पहिली नगरपालिका म्हणून १ मे १८५३ मध्ये स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरची ओळख आहे. परंतु वास्तवात २५ आॅगस्ट १८५२ मध्ये स्थापन झालेली पनवेल हीच पहिली पालिका असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. यासाठी ज्या नगरपालिका प्रथम क्रमांकाचा दावा करतात, त्यांच्या स्थापनेची तारीखही दिली होती. या वृत्तामुळे पनवेलमधील नागरिकांनीही पालिकेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे शहराध्यक्ष शिवदास कांबळे यांनीही नगराध्यक्षा चारुशीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना पत्र दिले आहे. पनवेल ही राज्यातील पहिली नगरपालिका असेल तर तो बहुमान शहरास मिळाला पाहिजे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शहराची महापालिका होण्यापूर्वी राज्यातील पहिली पालिका असल्याचा अधिकृत बहुमान शासनाकडून मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. नगरपालिकेचा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवला पाहिजे. आतापर्यंत केलेले चांगले काम, उपक्रम ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जतन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता नगराध्यक्षा व मुख्याधिकारी याविषयी काय भूमिका घेणार व कधी पाठपुरावा करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)