शांती यात्रेकडे शहरवासीयांची पाठ

By Admin | Updated: October 24, 2016 02:54 IST2016-10-24T02:54:19+5:302016-10-24T02:54:19+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशनसमोर शांती यात्रेचे आयोजन केले होते

Lessons for the people of Shanti yatra | शांती यात्रेकडे शहरवासीयांची पाठ

शांती यात्रेकडे शहरवासीयांची पाठ

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशनसमोर शांती यात्रेचे आयोजन केले होते. सायंकाळी शिवाजी चौकातही वॉक फॉर मुंढे मोहीम राबविण्यात आली. पण दोन्ही ठिकाणी नागरिकांची अत्यंत तुरळक उपस्थिती असल्याचे निदर्शनास आले.
पालिका आयुक्तांच्या विरोधात २५ आॅक्टोबरला अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. मुंढे हे प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे व नवी मुंबईमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे सुरवातीला त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. सोशल मीडियामधून वुई वाँट मुंढेची मोहीम राबविण्यात आली होती. अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवरही मुंढे यांच्या समर्थनामध्ये सोशल मीडियामधून अभियान राबविले जात आहे. याचाच भाग म्हणून रविवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौकापर्यंत वॉक फॉर मुंंढे या शांती यात्रेचे आयोजन केले होते. पण यासाठी जेमतेम २० ते २५ नागरिकच उपस्थित राहिले. उपस्थितांनी स्टेशनसमोर आयुक्त मुंढे आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे फलक दाखविले. पण परवानगी नसल्याने व नागरिकही कमी असल्याने रॅली काढण्यात आली नाही. सायंकाळी पुन्हा शिवाजी चौकामध्ये जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. मुंढे यांच्या समर्थनात हजारो नवी मुंबईकरांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले होते. पण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नागरिक उपस्थित राहिले.
मुंढे समर्थन रॅलीकडे शहरवासीयांनी पाठ फिरविल्यामुळे दिवसभरामध्ये सोशल मीडियातील मोहीमही शांत झाली होती. उपस्थित नागरिकांनी मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. पालिकेमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहराच्या हितासाठी मुंढे हवे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Lessons for the people of Shanti yatra