मुसळधार पावसामुळे ४०० टन भाजीपाला वाया, ग्राहकांनी मार्केटकडे फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:17 IST2017-08-31T00:17:01+5:302017-08-31T00:17:08+5:30
मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.

मुसळधार पावसामुळे ४०० टन भाजीपाला वाया, ग्राहकांनी मार्केटकडे फिरविली पाठ
नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.
अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील शेतकºयांना बसला आहे. बुधवारी मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ५१५ ट्रक व टेम्पोमधून शेतमाल विक्रीसाठी आला होता. परंतु मुंबई जलमय झाल्याने किरकोळ विक्रेते मालखरेदीसाठी कमी प्रमाणात आले. परिणामी, एक हजार टनांपेक्षा जास्त कृषी मालाची विक्रीच झाली नाही. पावसामुळे भिजून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला फेकून द्यावा लागला. सडलेल्या मालाचे ढीग मार्केटमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत होते. शिल्लक राहिलेला माल उद्या कमी किमतीमध्ये विकला जाईल.
कांदा-बटाटा मार्केटमध्येही १२५ वाहनांची आवक झाली होती; परंतु त्यामधील फक्त २७ वाहनांमधील मालाचीच विक्री झाली आहे. फळ मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली त्यात ८३ वाहनांमधील फळांचीच विक्री झाली आहे. गुरुवारी व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्याने ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरविली होती. जवळपास २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला असून, गुरुवारी सर्व व्यवहार सुरळीत होतील.
- शंकर पिंगळे, व्यापारी एपीएमसी
मार्केटचे नाव आवक
कांदा-बटाटा मार्केट १२५ गाड्या
फळ मार्केट २०८ गाड्या
भाजीपाला मार्केट ५१५ गाड्या
मसाला मार्केट ०८४ गाड्या
धान्य बाजार १८० गाड्या