महापेत गॅस पाइपलाइनमधून वायुगळती; अग्निशमन दलाला पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:02 IST2020-08-26T00:02:20+5:302020-08-26T00:02:28+5:30
दोन्ही दिशेची वाहतूक काही काळासाठी बंद

महापेत गॅस पाइपलाइनमधून वायुगळती; अग्निशमन दलाला पाचारण
नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरात गॅसची पाइपलाइन फुटल्याची घटना मंगळवारी २५ आॅगस्टला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. महानगर कंपनीची गॅस पाइपलाइन आहे. दुपारी पाइपलाइन फुटल्याचे लक्षात आले. यावेळी पाइपलाइनमधून वायुगळती होण्यास सुरुवात झाली होती.
ठाणे-बेलापूर मार्गावर महापे एमआयडीसी कडे जाणाऱ्या सर्कलजवळील ‘लोकमत’ प्रेससमोर ही घटना घडली आहे. येथील हनुमान मंदिरासमोरून जाणारे प्रत्यक्षदर्शी दीपक आंबोरे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाशी तत्काळ संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, काही मिनिटांतच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या औद्योगिक परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे महानगर गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी महेश नागबुडे आणि क्षेत्र अधिकारी प्रतीक गुप्ता यांनी पाइपलाइनचा व्हॉल्व बंद केल्यानंतर, येथील दोन्ही दिशेची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात येते. महानगर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ वायुगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोपरखैरणे अग्निशमन दलाचे सहायक केंद्र अधिकारी यू.जी. तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.