एमआयडीसीत वाहिनीला गळती
By Admin | Updated: December 14, 2015 01:29 IST2015-12-14T01:29:49+5:302015-12-14T01:29:49+5:30
धाटाव एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्रातून सोडले जात असलेल्या विषारी सांडपाण्याने कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत

एमआयडीसीत वाहिनीला गळती
रोहा : धाटाव एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्रातून सोडले जात असलेल्या विषारी सांडपाण्याने कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत तहसीलदार रोहा यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा झोळांबे कोपरी, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांनी दिला आहे.
धाटाव एमआयडीसीमधील सांडपाणी सीईटीपी केंद्रातून प्रक्रिया करुन शुध्द करुन सोडले जात असल्याचा दावा संबंधितांकडून वारंवार केला जातो. मात्र सीईटीपी केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यात विषारी घटक कायम असल्याची ओरड नेहमीच होत आहे. झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे, मात्र विषारी सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याने स्थानिकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
एमआयडीसीच्या दूषित सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला झोळांबे कोपरे गावाजवळ मोठे लिकेज असल्याने हे सांडपाणी नदीमध्ये मिसळून मासे मृत्युमुखी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या वाहिनीसाठी एमआयडीसीने काही दिवसांपूर्वीच करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र सांडपाण्याची गळती कायम असल्याने कुंडलिका नदीमधील जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. झोळांबे कोपरे, लक्ष्मीनगर या गावांमधील कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांत पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर दिनकर चावरेकर, नंदकुमार चावरेकर, प्रवीण चोरगे, गणेश दाभाडे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याबाबत लवकरच स्थानिक आमदारांची भेट घेणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. याबाबत सीईटीपीचे सप्रे यांच्याशी संपर्क साधला असता एमआयडीसीला या लाइन दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)