मराठी भाषेची सक्ती ठरणार महत्त्वाचे वळण- लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:00 IST2020-02-29T01:00:09+5:302020-02-29T01:00:15+5:30
वाशीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम

मराठी भाषेची सक्ती ठरणार महत्त्वाचे वळण- लक्ष्मीकांत देशमुख
नवी मुंबई : राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. भावी पिढीच्या जडणघडणीसाठी हे महत्त्वाचे वळण ठरणार आहे. यामुळे ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हांस भाग्य’ या कवितेत व्यक्त केलेली भावना प्रत्यक्षात साकार होतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख्य व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चित्रपट आणि नाट्य संकुल उभारावे, लोककलांचे प्रशिक्षण मराठी मध्येच देण्याची व्यवस्था व्हावी, त्यामध्ये पटकथा, नेपथ्य, दिग्दर्शन, नृत्य, संगीत यांचा समावेश असावा. या कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी मराठी कलाकार आपल्याकडे मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी संस्कृती श्रेष्ठ आहे. ती सिनेमातून जगाला कळू शकते. तो प्रयत्न व्हायला हवा. महाराष्ट्रातील १०० शहरांमध्ये कला महोत्सव होतात. त्यामध्ये लावणी, शास्त्रीय संगीत यांचा समावेश असतो. त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी सरकारने विशेष मराठी वाहिनी सुरू
करण्याची अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांमध्ये काम करताना भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. समाजामधील विविध वर्गातील वाचकवर्गाचा विचार करून भाषेची योजना करावी लागते, मराठीला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी व्यक्त केले. या वेळी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.