वकिलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी
By Admin | Updated: January 22, 2015 01:48 IST2015-01-22T01:48:15+5:302015-01-22T01:48:15+5:30
वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्या मुलींचे अपहरण करणारा उरणचा वकील संजय भोईर आणि त्याचा साथीदार किशोर ठाकूर यांना मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पुढे येत आहे.

वकिलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुंबई : वेश्याव्यवसायासाठी चिमुरड्या मुलींचे अपहरण करणारा उरणचा वकील संजय भोईर आणि त्याचा साथीदार किशोर ठाकूर यांना मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांना नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून अशाप्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भोईरविरोधात खांदेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. मात्र अद्याप त्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये भोईरसह एकूण ६ जणांची आरोपी म्हणून नोंद आहे. त्यात २ जण भोईरची मुले असल्याचा उल्लेख आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी भोईरकडे घरकाम करीत असे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक थोरात यांनी सांगितले, की या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. ज्या मुलीने बलात्काराची तक्रार दिली होती ती गर्भवती राहिली होती. तर किशोर ठाकूर याला दोनेक वर्षांपूर्वी वाशी पोलिसांनी बनावट क्रेडिट कार्डांद्वारे खरेदी करताना पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे बनावट नोटाही सापडल्या होत्या. या प्रकरणात किशोर चार महिने तळोजा कारागृहात बंद होता, अशी माहिती मिळते. कधी काळी किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता.
नवी मुंबईत किशोरचे सायबर कॅफे होते. त्या माध्यमातूनही त्याने अनेक सायबर गुन्हे केले असावेत, असा दाट संशय नवी मुंबई पोलिसांना आहे. प्राथमिक तपासातून उरण-करंजा येथील काही साथीदारांची नावे समोर आल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार अटकेच्या काही दिवस आधी नेरूळ परिसरातील एका बारमधील बारबालांनी किशोरला बेदम मारहाण केली होती, याची शहानिशा पोलीस करीत आहेत.
आरोपींचे मोबाइल, कॉम्प्युटर हार्डडिस्क ताब्यात घेऊन त्याआधारे तपास सुरू केला आहे. चौकशीतून त्यांनी अशाप्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षिका संगीता अल्फान्सो यांनी ‘लोकमत’ला दिली.
आरोपी न्यायालयीन कोठडीत : नेरूळ येथून लहान मुलीचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यात भोईर, त्याची पत्नी रुबी, ठाकूर आणि सलमान खान या चारही आरोपींना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या चौघांनी अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा वाशीत केला आहे.
भोईर आणि त्याची पत्नी रुबी या दोघांनी ठाकूर, खान यांच्याकरवी गेल्यावर्षी वाशी व नेरूळ येथून चार-पाच वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण केले होते. मुलींना वेश्याव्यवसायात ओढण्याचा, त्यांच्या कमाईवर ऐश करण्याचा दोघांचा कट होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने या चौघांना उरण, नवी मुंबई परिसरातून अटक करून मुलींची सुटका केली.