‘श्रीं’च्या मूर्तींवर अखेरचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:42 IST2017-08-02T02:38:27+5:302017-08-02T02:42:26+5:30
गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे.

‘श्रीं’च्या मूर्तींवर अखेरचा हात
प्राची सोनवणे ।
नवी मुंबई : गणेशाच्या आगमनाकरिता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, शहरातील चित्रशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. माती, रंग, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तीमध्ये २० टक्के दराने वाढ झाली आहे. गणेशचतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरु वात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाºया साहित्याच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी मजुरीमध्ये २०० ते २५० रुपयांनी वाढ केली आहे. मोठमोठ्या गणेश मंडळांबरोबरच आता घरगुती गणपतींमध्ये नावीन्यपूर्ण मूर्तीला वाढती मागणी आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
शाडूच्या मूर्तीच्या किमतींमध्ये झालेली वाढ, तसेच हाताळण्यास नाजूक असल्याने मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. मूर्तीसाठी वापरल्या जाणाºया सोनेरी, चंदेरी रंगांच्या किमती वाढल्या आहेत. चित्रपट, मालिकांमधील नावाजलेल्या भूमिका, पात्र अशा मूर्ती तयार करून घेण्याचा आग्रह मूर्तिकारांकडे केला जात असून त्याकरिता भाविकांनी सहा महिने अगोदरही मूर्तीचे बुकिंग केले आहे. बाहुबली, बाजीराव, जय मल्हार, लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती अशा अवतारातील मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
नवी मुंबईतील सायली कला केंद्र या चित्रशाळेत सध्या तिसरी पिढी श्री मूर्ती घडवित आहे. तरु ण मूर्तिकारांनी आजोबांकडून मूर्ती घडविण्याचे धडे घेतले असून अभियांत्रिकी, एमबीए, पदवी शिक्षणानंतरही नोकरी सांभाळून या कुटुंबातील तरुण मूर्ती साकारत आहे. पिढ्यानपिढ्या मूर्ती घडवित असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ती मूर्ती घडविण्याच्या कामात सहभागी होते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या कामात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असल्याची प्रतिक्रि या मूर्तिकार जनार्दन नाईक यांनी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेली कित्येक वर्षे या चित्रशाळेत शाडू मातीपासून मूर्ती तयार केल्या जात आहेत. यंदा वाढत्या मागणीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. सण, उत्सव साजरे करताना आजूबाजूच्या पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा मोलाचा सल्ला मूर्तिकार नाईक यांनी दिला. पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन या कार्यशाळेतील तरुण मूर्तिकारांकडून करण्यात आले.