बापट वाडा मोजतोय अखेरची घटका
By Admin | Updated: July 27, 2016 03:22 IST2016-07-27T03:22:11+5:302016-07-27T03:22:11+5:30
ऐतिहासिक वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेल शहराचा नावलौकिक होता. शहरात आजही ऐतिहासिक वास्तूंच्या खाणाखुणा पहायला मिळत असून या ऐतिहासिक वास्तूंची

बापट वाडा मोजतोय अखेरची घटका
- वैभव गायकर , पनवेल
ऐतिहासिक वाड्यांचे शहर म्हणून एकेकाळी पनवेल शहराचा नावलौकिक होता. शहरात आजही ऐतिहासिक वास्तूंच्या खाणाखुणा पहायला मिळत असून या ऐतिहासिक वास्तूंची नोंद विविध संग्रहालयात पाहावयास मिळत आहे. मात्र वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा ऱ्हास होत आहे. एकेकाळी शहराची शान म्हणून ओळखला जाणारा बापट वाडा देखभाल दुरुस्तीअभावी सध्या अखेरची घटका मोजत आहे.
सुमारे २९७ वर्षांपासून पनवेल शहरात डौलात उभा असलेल्या बापट वाड्याची पडझड सुरू आहे. १७२० मध्ये हा बापट वाडा बांधला गेला. पेशवेकालीन चिमाजी आप्पा जेव्हा वसईच्या स्वारीला चालले असताना त्यांच्या सैन्याला बापटांनी रसद पुरविली होती. बापट कुटुंबाकडे त्यावेळी पनवेलची वतनदारी पेशव्यांनी बहाल केली होती.
सध्या बापट वाड्यात ५० पेक्षा जास्त कुटुंबे राहत आहेत. वाड्याचा काही भाग मोडकळीस आला असून छतही अनेक ठिकाणी निखळले आहे. मात्र आजही पनवेलमध्ये गोकुळाष्टमी साजरी करताना सर्वात पहिली दहीहंडी बापट वाड्यातीलच फोडली जाते. यावेळी सर्व दहीहंडी पथक, सर्व देवस्थानातील पदाधिकारी याठिकाणी जमतात. तीनशे वर्षे जुन्या या वाड्याचे बांधकाम अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने केले गेले आहे. १७३० मध्ये बापटांनी पंढरपूरवरून विठ्ठल रखमाईची मूर्ती आणून त्यांची स्थापना याठिकाणी केली. तेव्हापासून आजतागायत याठिकाणी गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
बापट वाड्याची योग्य देखभाल दुरुस्ती न झाल्यास लवकरच ही ऐतिहासिक वास्तू लुप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वास्तूचे योग्य प्रकारे जतन करण्यात यावे अशी मागणी, वाड्यातील रहिवासी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
वाड्याचे बांधकाम
वाड्याचे बांधकाम हे विटा व मातीने असून आत दोन विहिरी आहेत. तसेच वाड्यात दोन चौक देखील बांधलेले आहेत. सध्या याठिकाणी बापटांची आठवी पिढी राहत आहेत, तर काही घरे भाड्याने देण्यात आली आहेत.
वाड्याची सद्य:स्थिती
शहराची शान म्हणून तीनशे वर्षे डौलात उभा राहिलेला हा वाडा अखेरची घटका मोजत आहे. वाड्याचे छत निखळलेले आहे. भिंती देखील पोकळ झालेल्या आहेत. वरचा मजला देखील मोडकळीस आलेला आहे.