उर्दू शाळेत शिक्षकाची उणीव
By Admin | Updated: March 1, 2016 02:42 IST2016-03-01T02:42:03+5:302016-03-01T02:42:03+5:30
येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत पाच शिक्षक मंजूर असतानाही मुख्याध्यापकांसह एकूण चारच शिक्षक शिक्षणाचा कारभार चालवीत असल्याने उर्वरित जागा तातडीने भरावी

उर्दू शाळेत शिक्षकाची उणीव
नागोठणे : येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत पाच शिक्षक मंजूर असतानाही मुख्याध्यापकांसह एकूण चारच शिक्षक शिक्षणाचा कारभार चालवीत असल्याने उर्वरित जागा तातडीने भरावी, अशी पालकवर्गाची मागणी आहे. याबाबत रोहे पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण महाले यांच्याकडे विचारणा केली असता, तालुक्यात खैरे खुर्द शाळेत शिक्षक कमी असल्याने नागोठणे शाळेचा एक शिक्षक तात्पुरता खैरे शाळेत पाठविण्यात आला आहे. या शिक्षकाचा पगार आजही नागोठणे शाळेतूनच निघत असल्याने त्यांना एक - दीड महिन्यात पुन्हा नागोठणे शाळेतच आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
येथील राजिपच्या उर्दू शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग असून, सध्या ११६ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या शाळेत पाच शिक्षक मंजूर आहेत व पूर्वी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक येथे कार्यरत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी येथील एक शिक्षक तालुक्यातील खैरे खुर्द शाळेत पाठविण्यात आल्याने सध्या येथे मुख्याध्यापक महिलेसह इतर तीन शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापकांना कार्यालयीन कामकाजासह विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सुद्धा भूमिका पार पाडावी लागत असल्याचे शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य मन्सूर इब्राहीम मुजावर यांचे म्हणणे आहे.
शाळेवर व्यवस्थापन समितीचे कायम लक्ष असते. शाळेतील सर्वच विद्यार्थी शिस्तप्रिय असून, शिक्षकवर्ग शिक्षण देण्याचे काम सुद्धा इमानेइतबारे करीत असतात. मात्र पूर्वी येथे पाच शिक्षक असताना यातील एक शिक्षकाची बदली झाल्याने मुख्याध्यापिकावरही शिकविण्याची वेळ आली असल्याचे मुजावर यांचे म्हणणे आहे. येथील शाळेत संगणकसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
(वार्ताहर)