पनवेलमध्ये कामगार कल्याण केंद्र!

By Admin | Updated: December 12, 2015 01:44 IST2015-12-12T01:44:50+5:302015-12-12T01:44:50+5:30

रायगड जिल्ह्यात काम करणाऱ्या दोन लाख कामगारांचे कल्याण साधण्याकरिता पनवेल येथे कामगार कल्याण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Labor Welfare Center in Panvel! | पनवेलमध्ये कामगार कल्याण केंद्र!

पनवेलमध्ये कामगार कल्याण केंद्र!

पनवेल : रायगड जिल्ह्यात काम करणाऱ्या दोन लाख कामगारांचे कल्याण साधण्याकरिता पनवेल येथे कामगार कल्याण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली. त्यामुळे आता कामगारांना परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले असून कक्षा आणखी रुंदावत चालल्या आहेत. तळोजा, पाताळगंगा, रोहा, महाड, माणगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. येथे रासायनिक, स्टील, फिशरी, इलेक्ट्रीकल अशा प्रकारचे विविध कारखाने आहेत. पाताळगंगाबरोबर इतर औद्योगिक वसाहतींच्या कक्षाही रुंदावत आहेत. खालापूर, पेण व उरण या तालुक्यांमध्येही औद्योगिकीकरण वाढत चालले आहे. सद्यस्थितीत एमआयडीसीमध्ये सुमारे दोन लाख कामगार काम करीत आहेत. रायगड जिल्ह्यातून कामगार कल्याण मंडळाला कोट्यवधींचा निधी जमा होतो. मात्र या ठिकाणच्या कामगारांना त्याचे फायदे घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याकरिता स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे केली होती. ठाकूर यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला कामगार मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये पनवेल येथे कामगार कल्याण मंडळाचे केंद्र सुरू करण्यास शासन तयार आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, राज्य परिवहन मंडळाकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. जागेचा प्रश्न सुटला की त्वरित केंद्र सुरू करण्याची घोषणा प्रकाश मेहता यांनी केली आहे.

Web Title: Labor Welfare Center in Panvel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.