पनवेल महापालिकेच्या निर्मितीची कुऱ्हाड
By Admin | Updated: October 5, 2016 03:11 IST2016-10-05T03:11:00+5:302016-10-05T03:11:00+5:30
पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील दोन सदस्य आणि पाच पंचायत समितींच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

पनवेल महापालिकेच्या निर्मितीची कुऱ्हाड
आविष्कार देसाई, अलिबाग
पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील दोन सदस्य आणि पाच पंचायत समितींच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. शेकापच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती प्रिया मुकादम यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने या विभागासाठी सत्ताधाऱ्यांना आता नवीन सभापती द्यावा लागणार आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीचा फटका जिल्हा परिषदेचे दुसरे सदस्य रामचंद्र कारावकर यांनाही बसला आहे. तळोजा निर्वाचन गणातील हरेश केणी, प्रमिला पाटील (आंबे), ज्ञानेश्वर पाटील (नावडे), ज्योत्स्ना पडहिरे (कळंबोली), गोपाळ भगत (कळंबोली) यांचेही पंचायत समिती सदस्यत्व रद्द झाले आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अद्यापही सुमारे सहा महिने बाकी होता. परंतु पनवेल महानगर पालिकेमध्ये या सदस्यांचे मतदार संघ समाविष्ट झाल्याने त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सदस्यत्व रद्द झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेकापला बसला. प्रिया मुकादम यांच्याकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद होते. त्यामुळे सरकारने त्यांना दिलेल्या सर्व सुविधाही रद्द झाल्या आहेत. मुकादम या सरकारी घर आणि वाहन वापरतच नव्हत्या. मात्र त्यांना त्यांचे जिल्हा परिषदेतील कार्यालय खाली करावे लागणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (प्रशासन) प्रकाश खोपकर यांनी सांगितले.