कलगुटकरांची सभा विनापरवानगी

By Admin | Updated: August 30, 2016 02:57 IST2016-08-30T02:57:58+5:302016-08-30T02:57:58+5:30

जमिनीचे रिलायन्स गॅस पाइपलाइनकरिता भू-संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी बोलाविली होती

Kulgautkar's meeting unannounced | कलगुटकरांची सभा विनापरवानगी

कलगुटकरांची सभा विनापरवानगी

कर्जत : येथील जमिनीचे रिलायन्स गॅस पाइपलाइनकरिता भू-संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी बोलाविली होती. कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारातील सभागृहात झालेली ती वादळी बैठक उपजिल्हाधिकारी करगुटकर यांनी आपल्या मर्जीने कोणत्याही परवानगी विना घेतली होती हे २९ आॅगस्ट रोजी सिद्ध झाले. ८ आॅगस्टचे परवानगी मिळावी म्हणून पत्र घेऊन आलेल्या रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या अधिकाऱ्यांनी तशी कबुली कर्जत पोलीस ठाण्यात दिली आहे.
रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी जमीन द्यावयाची नाही असे लेखी पत्र कर्जतचे आमदार लाड यांनी दिले. असे असताना आणि या गॅस पाइपलाइनला कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी शासनाने नेमलेले प्राधिकृत प्राधिकारी, पालघर येथील उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी ११ आॅगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांची बैठक घेतली. तेथे कर्जतचे आमदार आणि २००७ मध्ये गॅस पाइपलाइनमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांची आ. सुरेश लाड यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. तेथे अभय करगुटकर मारहाण प्रकरण घडले. आ. सुरेश लाड यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा १७ आॅगस्ट रोजी दाखल झाला होता. २४ आॅगस्ट रोजी कर्जत पोलिसांनी आमदार लाड यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. आमदार लाड हे शेतकऱ्यांसाठी त्या सभेला गेले होते आणि शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना मारहाण करण्याची वेळ आली, हे अनेक शेतकऱ्यांनी पाहिल्याने लाड यांना रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनी विरु द्ध पुकारलेल्या लढ्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी भूसंपादनाची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी २९ आॅगस्ट रोजी कंपनीचे अधिकारी शिरीष पोटे (५९ ) यांना आपल्या ठाणे येथील कार्यालयातून पत्र घेऊन कर्जत तहसील कार्यालयात पाठविले. शिरीष पोटे यांनी सोमवारी २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता कर्जत तहसील कार्यलयाच्या नोंदणी शाखेत ११ आणि १२ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेला कर्जत तहसील कार्यालयाने परवानगी द्यावी असे पत्र नोंद करण्याचा आग्रह केला. तहसीलमधील कर्मचाऱ्याने २९ आॅगस्टला तुमचे ८ आॅगस्टचे पत्र आज आवक होऊ शकत नाही असे सांगून नकार दिला. ही माहिती माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांना समजली. त्यांनी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आणि ५ते ७ शेतकरी यांच्यासह कर्जत तहसील कार्यालय गाठले. तेथे रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीकडून प्राधिकृत सक्षम प्राधिकारी अभय करगुटकर यांचे पत्र घेऊन आलेले निवृत्त अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी शिरीष पोटे त्यांच्या सोबत असलेले मोरे यांना तुम्ही पोलीस ठाण्यात चला असे सूचित केले. दोन्ही अधिकारी कर्जत पोलीस ठाण्यात आले, तेथे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शरद लाड आणि अनेक शेतकऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजनुद्दीन मुल्ला यांना हकिकत सांगितली.
त्यानंतर पोलिसांनी रिलायन्स गॅस पाइपलाइनचे अधिकारी शिरीष पोटे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांनी ११ आणि १२ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांची सभा घेण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयातील सभागृह मिळावे यासाठी ८ आॅगस्टचा अर्ज घेऊन आलो असे नमूद केले. उपजिल्हाधिकारी करगुटकर यांच्या सहीचे मागील तारखेचे पत्र मारहाण प्रकरण झाल्यानंतर नोंदणी शाखेत जमा करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे गॅस पाइपलाइनसाठी ११ आॅगस्टला कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात घेतलेली शेतकऱ्यांची बैठक विना परवानगी घेतली असल्याचे सिद्ध झाले आहे.

Web Title: Kulgautkar's meeting unannounced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.