कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
By कमलाकर कांबळे | Updated: March 11, 2024 20:00 IST2024-03-11T20:00:37+5:302024-03-11T20:00:54+5:30
राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने शुक्रवार, १५ मार्च रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
नवी मुंबई : राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने शुक्रवार, १५ मार्च रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई-मडगावसह या विभागातून धावणाऱ्या पाच गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
मेगा ब्लॉकमुळे मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड (५०१०८) या गाडीचा १५ मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास सांयकाळी ७:३० वाजता म्हणजेच ८० मिनिटे उशिराने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजीचा पूर्वनियोजित प्रवास २ तास ०५ मिनिटे उशिराने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन-सीएसएमटी (१०१०४) या मांडोवा एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास करमाळी आणि सावंतवाडी रोडदरम्यान २० मिनिटे रोखून धरला जाणार आहे.
तर मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा १५ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटे स्थगीत केला जाणार आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटे रोखून धरला जाणार आहे, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.