ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात पनवेलकर
By Admin | Updated: February 9, 2016 02:29 IST2016-02-09T02:29:20+5:302016-02-09T02:29:20+5:30
मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते

ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात पनवेलकर
- नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई, नवी मुंबईप्रमाणे पनवेल परिसरालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, गरज नसताना वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ व दिवसा ६० ते ७१ डेसिबलपर्यंत जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या गोंगाटामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ध्वनिप्रदूषण ही देशातील सर्वच शहरांमधील गंभीर समस्या झाली आहे. वाहनांची वाढती संख्या, उत्सवांमधील डीजेसह मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम, अनावश्यकपणे वाजविण्यात येणारे हॉर्न यामुळे मर्यादेपेक्षा जास्त गोंगाट दिवस-रात्र सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गोंगाटामधून पनवेलही सुटलेले नाही. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात नियमित वाहनांची गर्दी असते. याठिकाणी वाहतूक नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. चक्का जाम झाल्यानंतर प्रत्येक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवत असल्याने प्रवाशांना कानठळ्या बसत आहेत. उरण नाका, मच्छी मार्केट, पटेल मोहल्ला, शिवाजी चौक व इतर सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हीच स्थिती आहे. पनवेलमध्ये पूर्णपणे व्यावसायिक नोड नाही. निवासी व वाणिज्य अशी संमिश्र रचना सर्वच ठिकाणी आहे. वास्तविक या सर्व ठिकाणी रात्री ४५ व दिवसा ५५ डेसिबल एवढा आवाज असणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी आवाजाची पातळी रात्री ४५ ते ५८ पर्यंत जावू लागली आहे. दिवसा अनेक ठिकाणी ६० ते ७१ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा जात आहे.
वाहन चालक आवश्यकता नसतानाही वारंवार हॉर्न वाजवत असल्याने ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. याशिवाय लग्न, उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या दरम्यान साऊंड सिस्टीमचा आवाज वाढविला जात आहे. पनवेल एस. टी. स्टँड परिसरात हॉस्पिटलही आहेत. इतरही काही ठिकाणी हॉस्पिटल असणाऱ्या ठिकाणी वाहनांचा गोंगाट वाढत असून त्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. पनवेलमध्ये शाळा, मंदिर, रुग्णालय परिसरामध्ये शांतता क्षेत्राचे फलक लावणे आवश्यक आहे. परंतु अनेक ठिकाणी नो हॉर्नचे फलक लावलेले नाहीत. यामुळे शांतता क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीही बिनधास्तपणे वाहनचालक हॉर्न वाजवत असतात. ध्वनिप्रदूषणाचा गंभीर परिणाम आरोग्यावर होवू लागला आहे. जादा आवाजामुळे बहिरेपणा येतोच याशिवाय नागरिकांमधील चिडचिडेपणा वाढतो. वारंवार डोके दुखणे व इतर आजारांनाही सामोरे जावे लागते.
नो हॉर्न चळवळीची गरज
शहरवासीयांना ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी नो हॉर्न चळवळ राबविण्याची गरज आहे. सिग्नल सुरू असताना, ट्रॅफिक जाम झालेले असताना विनाकारण हॉर्न वाजवू नये, अशी स्वयंशिस्त प्रत्येक चालकाने पाळली पाहिजे. शाळा, रुग्णालय परिसरामधून जातानाही हॉर्न वाजविणे बंद केले पाहिजे. फक्त वाहतूक पोलीस ध्वनिप्रदूषण थांबवू शकत नाहीत. शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तपणे नो हॉर्न प्लीज ही मोहीम राबविण्याची वेळ आली आहे.
शांतता क्षेत्रे घोषित करावी
शहरात शिक्षण संस्था, रुग्णालय, वृद्धाश्रम व इतर महत्त्वाच्या ठिकाणी शांतता क्षेत्रे घोषित करून, तसे बोर्ड वाहनधारकांना दिसतील अशापद्धतीने लावले पाहिजेत. शाळेच्या बाहेर मुलांना सोडण्यासाठी व पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या पालकांनी व स्कूलबसचालकांनीही हॉर्न वाजविणे थांबविले पाहिजे. शांतता क्षेत्रात गोंगाट करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
पनवेलमध्ये वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सिग्नल, वाहतूककोंडी झाल्यानंतर मोठ्याने हॉर्न वाजविले जात आहेत. वाहने रोडवर उभी केल्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व पुन्हा हॉर्नचा गोंगाट सुरू होतो. याशिवाय उत्सव काळातही ध्वनिक्षेपकाचा आवाज जास्त असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.
- अरुण भिसे,
पोलीस निरीक्षक,
पनवेल वाहतूक विभाग