मुलाने केली वडिलांची हत्या
By Admin | Updated: September 23, 2015 23:52 IST2015-09-23T23:52:28+5:302015-09-23T23:52:28+5:30
आई वडील लग्न करून देत नाही या कारणावरून जव्हार तालुक्यातील बांबरी वाडा येथे रविवारी किरण पवार (१८) याने वडील विनायक पवार (६०) यांची गळा दाबून हत्या केली

मुलाने केली वडिलांची हत्या
जव्हार : आई वडील लग्न करून देत नाही या कारणावरून जव्हार तालुक्यातील बांबरी वाडा येथे रविवारी किरण पवार (१८) याने वडील विनायक पवार (६०) यांची गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, विनायक गोविंद पवार (६०) आणि रखमी विनायक पवार (५५) हे शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाची गुजराण करीत होते. मात्र त्यांचा मुलगा किरण हा कोणताही कामधंदा न करता वाममार्गाला लागला होता. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने आपले लग्न करून द्यावे म्हणून किरण हा आईवडीलांशी सतत भांडत असे. याच कारणावरून रविवारी दुपारी त्याने आईवडीलांशी वाद घातला. ते ऐकत नसल्याचा राग आल्याने किरणने वडिलांना मारहाण करून त्यांचा गळा दाबला. यात वडीलांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या घटनेची खबर तात्काळ जव्हार पोलीस स्टेशनला कळविली. वडीलांचा खून केल्यानंतर किरणने आईशी वाद घालण्यास सुरूवात केली. तिलाही ठार करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जव्हार पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी किरणच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतल्याने रखमीचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले. किरण याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)