स्वतंत्र महापालिकेसाठी खारघर बंद

By Admin | Updated: September 8, 2016 03:02 IST2016-09-08T03:02:42+5:302016-09-08T03:02:42+5:30

पनवेल महानगरपालिकेत खारघरचा समावेश नको याकरिता खारघरमधील काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Kharghar is closed for an independent municipal corporation | स्वतंत्र महापालिकेसाठी खारघर बंद

स्वतंत्र महापालिकेसाठी खारघर बंद

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत खारघरचा समावेश नको याकरिता खारघरमधील काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गुरु वारी ९ सप्टेंबरला या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे. खारघर शहरासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी व खारघर शहराला पनवेल महानगरपालिकेमधून वगळावे या मागणीसाठी खारघरमध्ये बुधवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
खारघर एक्शन टेकन कमिटीच्या वतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी शहरातील सेक्टर २०, १९, ४, ३०, ३४ , ३५ याठिकाणच्या परिसरात बंद पाळण्यात आला. मात्र शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले सेक्टर ४, ७ याठिकाणी बंदचा काहीच परिणाम दिसून आला नाही. या बंदला शेकाप, मनसे, काँग्रेसने पाठिंबा दिला होता. भाजपा, शिवसेना या बंदमध्ये सहभागी झालेली नव्हती. खारघर शहरात पनवेल महानगरपालिकेवरून राजकारण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मनसे, शेकापला खारघर शहराची स्वतंत्र महानगरपालिका हवी आहे. तर शिवसेनेची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. खारघरला पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यास विरोध नाही तर पनवेल महानगरपालिकेला खारघर-पनवेल महानगरपालिका नाव द्यावे, अशी मागणी असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुनाथ पाटील म्हणाले. खारघर एक्शन टेकन कमिटीच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेवर गुरु वारी सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)


अर्धवट विकासाच्या आधारे खारघर शहराला महानगरपालिकेत समाविष्ट करणे भविष्यात विविध प्रश्न उद्भवतील. खारघरच्या विकासाला हा मुद्दा बाधा ठरू नये म्हणून जनहित याचिका दाखल करून त्यामध्ये आमचे म्हणणे मांडले आहे. आजच्या बंदला शेकापचा पाठिंबा आहे.
- संजय घरत, चिटणीस, शेकाप खारघर

भविष्यातील मोठे महानगर म्हणून खारघर शहर उदयास येणार आहे. सिडकोने देखील पनवेल महानगरपालिकेत खारघर शहराचा समावेश करू नये अशी भूमिका मांडली होती. याच मुद्याला अनुसरून आम्ही ही जनहित याचिका दाखल केली आहे.
- केसरीनाथ पाटील, मनसे जिल्हा चिटणीस

Web Title: Kharghar is closed for an independent municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.