बाजार समितीच्या नोटीसला केराची टोपली
By Admin | Updated: July 28, 2016 02:42 IST2016-07-28T02:42:52+5:302016-07-28T02:42:52+5:30
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकामांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ए व एम विंगमधील सुरक्षा भिंत व गाळ्यांमधील जागेवर अतिक्रमण

बाजार समितीच्या नोटीसला केराची टोपली
- नामदेव मोरे, नवी मुंबई
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकामांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ए व एम विंगमधील सुरक्षा भिंत व गाळ्यांमधील जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना एपीएमसी प्रशासनाने नोटीस दिली आहे. परंतु या नोटीसला केराची टोपली दाखविण्यात आली असून अद्याप अनधिकृत बांधकाम हटविण्यात आलेले नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची परवानगी न घेतला २ हजारपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. सर्वाधिक अतिक्रमण मसाला मार्केटमध्ये झाले आहे. बाजार समितीने वाढीव चटईक्षेत्र मंजूर केले असल्याचे कारण देत जवळपास ६०० गाळेधारकांनी अतिक्रमण केले आहे. यामधील काहींनी पोटमाळे बांधले तर बहुतांश व्यापाऱ्यांनी दोन मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे. यासाठी कोणाचीही परवानगी घेतलेली नाही. लोकमतने ही बाब उघडकीस आणल्यानंतर महापालिका प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरवात केली होती. डी विंगमधील ३४ गाळ्यांना सील लावले होते. बाजार समिती प्रशासनानेही व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्यात यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा नोटीस पाठविल्या आहेत. मार्केटमधील ए व एम विंग सुरक्षा भिंतीला लागून आहे. दोन्हीमध्ये जवळपास चार ते पाच फूट अंतराची मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. नियमानुसार या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु या विंगमधील बहुतांश व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम करून जागा अडविली आहे. व्यवसायासाठी मोकळ्या जागेचाही वापर सुरू आहे. काहींनी प्रसाधनगृह बांधले आहे. एम विंगमधील एका व्यापाऱ्याने महेंद्रा कोटक बँकेला गाळा भाडेतत्वावर दिला आहे. बँकेने मागील बाजूला शेड टाकले आहे. पुढील बाजूला धक्क्यावर जनरेटर ठेवला आहे. यामुळे माथाडी कामगारांना व खरेदीदारांना येथून ये - जा करताना अडथळा होवू लागला आहे. बाजार समितीने परवानगी दिलेली नसताना गाळ्याच्या मूळ बांधकामामध्ये बदल करण्यात आला आहे. बदल करताना पालिकेचीही परवानगी घेतलेली नाही.
एम गल्लीमधील व्यापाऱ्यांनी बांधकामाचे, एपीएमसीचे व पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. मार्केटच्या मलनि:सारण वाहिन्यांवर बांधकाम केले आहे. अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या फुटल्या असून सांडपाणी रोडवर येवू लागले आहे. बाजारसमितीने अतिक्रमण काढण्याची दोन वेळा नोटीस दिली आहे. परंतु या नोटीस कचऱ्याच्या डब्यात टाकल्या आहेत. याच विंगमधील १८ व १९ नंबरच्या गाळेधारकाने तब्बल दोन मजले वाढविले आहेत. अनधिकृतपणे पोटमाळाही बांधला आहे. एपीएमसीमधील गाळ्यांचा वापर फक्त कृषी व्यापारासाठी करणे आवश्यक आहे. परंतु एम गल्लीमध्ये इतरही वस्तूंचा व्यवसाय सुरू आहे. हेवल्स कंपनीचा बोर्डही गाळ्याच्या बाहेर लावला आहे.
शिवाय गाळ्यामध्ये अनधिकृतपणे लिफ्ट बसविण्यात आली असून यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
टूर्स अँड ट्रॅव्हल्सचाही व्यवसाय
मसाला मार्केटच्या एम विंगमध्ये नियम धाब्यावर बसवून इतर व्यवसाय सुरू आहेत. एका गाळ्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू आहे. दुसऱ्या एका व्यापाऱ्याने गाळ्यामध्ये वाढीव मजल्याचे बांधकाम करून लिफ्ट बसविली आहे. महेंद्रा कोटक बँकेने गाळ्याच्या बाहेरील धक्क्यावर जनरेटर सेट ठेवला आहे. यानंतरही बाजार समिती प्रशासन काहीच कारवाई करत नाही.
दोन वेळा दिली नोटीस
सुरक्षा भिंत व गाळयांच्या मधील जागेत अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना एपीएमसीने ५ जुलैला नोटीस दिली आहे. मलनि:सारण वाहिनीवर बांधकाम केले असून त्यामुळे या विंगमधील मलनि:सारण वाहिनी फुटून सांडपाणी बाहेत येत आहे. अतिक्रमणामुळे दुरूस्तीचे काम करता येत नसल्याने तत्काळ अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली होती. परंतु व्यापाऱ्यांनी काहीच कारवाई केली नसल्याने पुन्हा १४ जुलैला स्मरणपत्र दिले आहे. परंतु यानंतरही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण जैसे थे ठेवले असून नियम तोडणाऱ्यांवर प्रशासनाचा वचकच राहिलेला नाही.
गुन्हे दाखल करावे
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे. महापालिकेने व एपीएमसी दोन्ही प्रशासनाने संबंधितांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करावे. याशिवाय अतिक्रमणामुळे मलनि:सारण वाहिनीची दुरूस्ती करता येत नाही. सांडपाणी रोडवर येवून दुर्गंधी पसरत असून साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू व मलेरियाची साथ पसरु लागली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.