कळंबोली सर्कल अंधारात

By Admin | Updated: September 15, 2015 23:26 IST2015-09-15T23:26:25+5:302015-09-15T23:26:25+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येत असली तरी कळंबोली सर्कल अंधारात बुडाले आहे. या ठिकाणचे दोनही हायमास्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद

Kalamboli circle in darkness | कळंबोली सर्कल अंधारात

कळंबोली सर्कल अंधारात

कळंबोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येत असली तरी कळंबोली सर्कल अंधारात बुडाले आहे. या ठिकाणचे दोनही हायमास्ट गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने वाहतूक नियमनाला अडथळे निर्माण होत आहेत. याच मार्गावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी वर्दळ असल्याने हे हायमास्ट त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी वाहतूक शाखेने सिडकोकडे केली आहे. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
कळंबोली सर्कल येथे पनवेल-सायन, मुंबई- पुणे, जेएनपीटी, द्रुतगती त्याचबरोबर मुंब्रा महामार्ग एकत्र येतात. हे अतिशय महत्त्वाचे वाहतूक बेट असून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यानुसार चार वर्षांपूर्वी या ठिकाणी सिडकोने दोन हायमास्ट बसवले. मुंब्रा महामार्ग आणि एक जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गाच्या प्रवेशव्दारावर हे दिवे बसविण्यात आले. त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्याने कधी दिवे बंद कधी चालू असे चित्र असते.
गणेशोत्सवाकरिता लाखो कोकणवासीय मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून मूळ गावाला जातात. हजारो वाहने कळंबोली सर्कल येथून जात असल्याने नवी मुंबई पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे. काही सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक या ठिकाणी मदतीकरिता येतात. वाहतूक कोंडी, अपघात त्याचबरोबर रहदारीस अडथळा येवू नये याकरिता खबरदारी घेण्याचे सरकारी निर्देश असले तरी सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. दोनही हायमास्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी कळंबोली सर्कल परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे वाहतूक नियमनास अडथळे निर्माण होऊन अपघातांची शक्यता असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.

कळंबोली सर्कलला हायमास्ट अतिशय महत्त्वाचे असून त्याचा परिणाम वाहतूक नियमनावर होत आहे. गणेशोत्सवाकरिता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र हायमास्टच बंद असल्याने अनेक अडचणी येत आहेत. संबंधित विभागाकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा

Web Title: Kalamboli circle in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.