आठ वर्षांनंतर न्याय
By Admin | Updated: March 17, 2015 01:10 IST2015-03-17T01:10:12+5:302015-03-17T01:10:12+5:30
मुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या.

आठ वर्षांनंतर न्याय
जयंत धुळप ल्ल अलिबाग
मुरुड एकदरा कोळी वाड्यातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबांच्या फिर्यादी रविवारी दाखल करण्यात आल्या. त्यानुसार तडीपार करण्यात आलेल्या मोतीराम पाटील आणि अन्य १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड असिम सरोदे यांच्या माध्यमातून याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
एकदरा कोळी जात पंचायतीचा प्रमुख, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेचा अध्यक्ष आणि सध्या तडीपार असलेल्या मोतीराम चाया पाटील याच्याविरोधात २००७पासून अनेक तक्रारी मुरुड पोलिसांकडे आल्या होत्या. मात्र गेली आठ वर्षे गुन्हे दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केली. मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वाळीत प्रकरणात एकाच दिवशी एकाच वेळी चार गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रश्मीकांत चंद्रकांत पाटील यांनी २००७मध्ये मोतीराम चाया पाटील अध्यक्ष असलेल्या, हनुमान मच्छीमार सहकारी संस्थेच्या सहकारी संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्याने त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आले. त्यामुळे त्यांना कुटुंबासह मुंबईत गणेशनगर, वडाळा येथे राहायला जावे लागले. रश्मीकांत यांच्या तक्रारींची दखलच घेतली नाही. रश्मिकांत यांच्या कुटुंबीयांना सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत येण्यास बंदी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील महिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. रश्मीकांत यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
साक्ष दिल्याने
सात वर्षे वाळीत
गणेश आत्माराम दामशेट आणि नारायण जान्या पाटील या दोघांनी एकदरा गावातील जगन्नाथ मल्हारी वाघरे यांच्या बाजूने जातपंचायतीच्या विरुद्ध पोलिसांकडे साक्ष दिली होती. त्यामुळे वाघरे यांच्या कुटुंबाशी संबंध ठेवल्यामुळे दामशेट व पाटील यांना १६ जानेवारी २००८पासून वाळीत टाकण्यात आले. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नारायण भिकू वाघरे यांचे काका मल्हारी वाघरे यांना वाळीत टाकल्यानंतर, त्यांच्या बोटीवर नारायण वाघरे यांनी तांडेल म्हणून काम करणे चालू ठेवल्याने व त्यांच्याशी बोलणे सुरूच ठेवल्याने वाघरे व त्यांच्या कुटुंबीयांना गावात फिरण्यास बंदी घालण्यात आली. त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या ग्रामस्थांकडून दंडाची मागणी करून दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणीही गुन्हा दाखल केला.