टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:54 IST2015-12-10T01:54:08+5:302015-12-10T01:54:08+5:30
ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली

टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!
अजित मांडके, ठाणे
ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली असली तरी आता हा पर्याय सुरु होण्यापूर्वीच रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरीत लवादाने संजय गांधी नॅशनल पार्क परिसरापासून १० किमीपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम या पर्यायी मार्गावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या सहा पदरी टनेलसाठी सुमारे ४ हजार कोंटीचा खर्च केला जाणार असून, हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून आता पुढील मंजुरीसाठी वनविभाग, पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणि वन्यजीव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण टनेल वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने हा सुरक्षित मार्ग मानला जात होता. परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे हा मार्ग कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाबाबत ठाण्यात सध्यातरी संभ्रमाचे वातावरण असून हे अंतर १०० मीटर का १० किमी याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु १० किमी असले तरी किंवा १०० मीटर असले तरी देखील या दोन्ही मुद्यांवरुन या महत्त्वाच्या प्रकल्पात मात्र अडथळेच निर्माण होणार आहेत.
या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली आहे, त्याचे अद्याप डिझाइन तयार नाही. तसेच वन विभागासह विविध माध्यमांच्या परवानग्यादेखील घेणे शिल्लक आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात १० किमी पर्यंत बांधकामांना बंदी घातल्याची वृत्त धडकताच शहरात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाण्यात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे.
पालिकेच्या म्हणण्यानुसार असा कोणताही नवा आदेश सध्या प्राप्त त्यांना झाला नाही. मात्र, जुलैमध्ये आलेल्या आदेशानुसार १०० मीटर परिसराच्या आत कोणतेही बांधकाम करता येऊ शकणार नाही.
परंतु १० किमी पर्यंतचे आदेश सध्या तरी प्राप्त झालेले नाहीत. १० किमीपर्यंत आदेशात वाईल्ड लाईफची परवानी घेण्याचे बंधन असू शकते, असाही कयास प्रशासनाने लावला आहे.