- नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या ४० हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे; परंतु निविदा प्रक्रिया वेळेत न झाल्यामुळे प्रत्यक्षात कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. १७ मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.संगणक शिक्षकाने १७ मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हा घडल्यानंतर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु वास्तवामध्ये प्रशासकीय दिरंगाईमुळेच अद्याप कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. यापूर्वी शाळेच्या वेळेत दुकानामध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याची मागणी नगरसेवक व राजकीय कार्यकर्त्यांनी करण्यास सुरुवात केली होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जवळपास ७४ शाळांमध्ये एकूण ६८७ कॅमेरे बसविण्यासाठी पाच कोटी २४ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावास मंजुरीही देण्यात आली होती. प्रशासकीय मंजुरी होऊन १६ महिने झाल्यानंतरही प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा होता; परंतु तब्बल सव्वावर्षानंतरही प्रत्यक्षात कार्यवाही होऊ शकली नाही.महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असते, तर संगणक शिक्षकाकडून मुलींची छेडछाड झाली नसती. दोन महिन्यांपासून शिक्षकाकडून मुलींची छेड काढली जात होती; परंतु यावर लक्ष ठेवण्यासाठी काहीही यंत्रणा नसल्यामुळे हा प्रकार वेळेत निदर्शनास आला नाही. कॅमेरे असते तरी कदाचित हा गुन्हाच घडला नसता. गुन्हा घडून गेल्यानंतर आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तत्काळ सुरक्षेकडे काटेकोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच शाळांमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे; परंतु याच उपाययोजना यापूर्वी करणे आवश्यक होते, अशा प्रतिक्रिया पालकवर्गातून व्यक्त केल्या आहेत.सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण असावेमहानगरपालिकेच्या शाळांमध्ये खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरक्षारक्षक पुरविण्यात येतात. सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक शाळांमध्ये तैनात केले जात नाहीत. जे सुरक्षारक्षक आहेत त्यांना कधी व किती वेळा प्रशिक्षण दिले, याविषयी शंका आहे. यामुळे जे सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत ते गणवेशात असावे व त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे.‘लोकमत’ने केला होता पाठपुरावामहानगरपालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी सर्वप्रथमच इंदिरानगरमधील शिवसेना कार्यकर्ते महेश कोठीवाले यांनी केले होती. यानंतर याविषयी ‘लोकमत’नेही वारंवार पाठपुरावा केला होता. सर्वसाधारण सभेमध्ये आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रस्ताव आल्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा सुरू केला होता. ९ जानेवारी २०२० ला शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा विसर, महापालिकेच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.चारित्र्य पडताळणी करण्याचे निर्देश : महानगरपालिका शाळांमध्ये सीएसआर फंडातून काही सुविधा पुरविण्यात येतात. यापुढील काळात सीएसआर फंडातून सुविधा पुरविताना खासगी व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नेमणूक करण्यात येणाºया कर्मचाऱ्यांचीही चारित्र्य पडताळणीचे निर्देश दिले आहेत.तत्काळ कारवाईचे आदेशमहापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्यार्थिनींशी गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या ५५ प्राथमिक व १९ माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सीसीटीव्हीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुलांमध्ये वाढत्या वयात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. राणी बंग यांची तारुण्यभान या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित केल्याचे व अभया नाटकाचे विशेष प्रयोग आयोजित केल्याचेही सांगितले.
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाकडून सीसीटीव्ही बसवण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:13 IST