जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:50 IST2017-07-31T00:50:03+5:302017-07-31T00:50:03+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या वतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस
वैभव गायकर ।
पनवेल : जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाच्या वतीने डिजिटल शाळा व हायटेक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र पनवेलसारख्या स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणाºया क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्याने अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
पनवेल महानगर पालिकेत तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. जवळजवळ २९ महसुली गावे पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर याठिकाणी ५१ जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेच्या अंतर्गत येत आहेत. मात्र या शाळांची सद्यस्थिती पाहता कोणत्याही क्षणी याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहेत. त्यामुळे पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पालिकेत समाविष्ट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५१ शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये २५० शिक्षक असून जवळजवळ ५००० पेक्षा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अनेक शाळा मोडकळीस आलेल्या असून त्यांच्या डागडुजीची अवस्था आहे. संबंधित शाळा जिल्हा परिषदेमधून पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर जिल्हा परिषदेने शाळांना निधी देणे बंद केले आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांना वीज बिल भरण्यासाठी देखील पैसे नसल्याचे उघड झाले आहे.
पावसाळ्यात अनेक शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये गळती लागली आहे. शाळांच्या भिंती, छत जीर्ण झाल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या भीती व्यक्त होत आहे. नुकतेच धरणा कॅम्प येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे छप्पर मुसळधार पावसाने उडाल्याचा प्रकार घडला. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा याठिकाणी भरते. एका खासगी कंपनीने दिलेल्या निधीमुळे या शाळेतील एक वर्ग सुरु आहे. छत उडणे, भिंतीला ओल येणे आदी प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थी शाळेत बसण्यास घाबरतात.
खारघरमधील मुर्बी, बेलपाडा, धामोळे आदिवासी शाळेमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. यापैकी बेलपाडा गावातील शाळा जमिनीच्या वादातून बंद पडली आहे. एका भाड्याच्या खोलीत ही शाळा भरत होती. मात्र तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने भाडे मिळाले नसल्याने ती शाळा देखील बंद पडली आहे.
सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेत हस्तांतरणाचा विषय गाजत आहे. मात्र या प्रकाराची काहीही कल्पना नसलेल्या चिमुरड्यांना मात्र आपले जीव धोक्यात घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका नेत्रा किरण पाटील व हरेश केणी यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. या विषयावर पालिकेत चर्चा देखील झाली. मात्र पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरामुळे समाधान झाले नसल्याची खंत नगरसेवक हरेश केणी यांनी व्यक्त केली.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पनवेल नगरपरिषदेच्या शाळांचे कामकाज सुधारण्यासाठी पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रयत्न केले.
शाळेवर शिपाई नेमणे, विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविणे तसेच शाळेच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यास आयुक्तांनी पुढाकार घेतला. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांचा विषय सोडविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. शाळा हस्तांतरणाबरोबरच शेकडो शिक्षकांना देखील पालिकेत समाविष्ट करून घेण्याचा जिल्हा परिषदेचा अट्टाहास आहे. मात्र सध्याच्या घडीला या शाळांपैकी अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.