हस्तांतरणाचा प्रश्न लवकर सुटणार

By Admin | Updated: June 12, 2016 00:54 IST2016-06-12T00:54:17+5:302016-06-12T00:54:17+5:30

हस्तांतरणाअभावी घणसोली कॉलनी विभागास महापालिका सुविधा पुरवण्यात अडचणी येत असल्यामुळे हा विभाग महापालिकेकडे वर्ग व्हावा, यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास

The issue of transfer will start soon | हस्तांतरणाचा प्रश्न लवकर सुटणार

हस्तांतरणाचा प्रश्न लवकर सुटणार

नवी मुंबई : हस्तांतरणाअभावी घणसोली कॉलनी विभागास महापालिका सुविधा पुरवण्यात अडचणी येत असल्यामुळे हा विभाग महापालिकेकडे वर्ग व्हावा, यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी रबाळे विभागातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत नागरिकांशी सुसंवाद साधला. यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक स्थापण करून दंडाच्या रकमेतही वाढ करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट नागरिकांशी संपर्क साधून समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘वॉक विथ कमिशनर‘ उपक्रमांतर्गत रबाळे परिसराला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित स्थानिक रहिवाशांनी आयुक्तांकडे त्यांच्या समस्या मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये कचऱ्याचे ढीग, उघड्या विद्युत वायरी, रस्ते तसेच अनधिकृत फेरीवाले यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्याशिवाय रबाळे, गोठीवलीदरम्यान रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नामुळे अनेकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत असल्याने पादचारी पुलाची मागणी करण्यात आली. नागरिकांकडून ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडण्याचे टाळण्यासाठी पादचारी पूल बनवण्यात आले आहेत. परंतु रेल्वे रुळावर आवश्यक ठिकाणी पादचारी पूल बनवण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. रबाळे रेल्वे स्थानकालगत तसेच तळवली येथे रस्त्यालगत उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमुळे नागरी आरोग्याचा प्रश्न उद्भवत असून शहराच्या लौकिकतेलाही बाधा पोचत आहे. नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना आयुक्त मुंढे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. हे पथक संपूर्ण शहरासाठी कार्यरत राहणार असून, त्यांच्याद्वारे आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या १०० रुपये रकमेत भरमसाठ वाढ करण्याचीही सूचना त्यांनी केली.
घणसोली कॉलनी परिसरातील नागरिकांनी देखील आयुक्तांची भेट घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. विभागात चांगले रस्ते नसून अतिक्रमणासह अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पदपथही चालण्यायोग्य राहिलेले नाहीत. परंतु घणसोली विभागाचे हस्तांतरण महापालिकेकडे झालेले नसल्यामुळे नागरिकांना सुविधा पुरवण्यात अडचण होत असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे हा विभाग लवकरात लवकर महापालिकेकडे वर्ग व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रक्रियेला सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

- घणसोलीतील काही सोसायट्यांनी आयुक्तांची भेट घेऊन ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली. त्याकरिता प्रशासनाकडून जागेची उपलब्धता होईल का, यासंबंधीची त्यांनी विचारणा केली. ही बाब सकारात्मक घेत आयुक्तांनी त्यांना प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केल्यामुळे सोसायटीधारकांमध्ये सकारात्मक निर्णयाची अपेक्षा केली आहे.

Web Title: The issue of transfer will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.