एमआयडीसीत अनियमित पाणीपुरवठा; रहिवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:58 IST2019-07-24T23:58:48+5:302019-07-24T23:58:58+5:30
शहरात सर्वांना समान पाणीपुरवठा करण्याची मागणी

एमआयडीसीत अनियमित पाणीपुरवठा; रहिवाशांचे हाल
नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात शहराच्या काही भागातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: एमआयडीसी भागातील झोपडपट्ट्यांच्या वसाहतीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पातळी खालावली आहे. यावर्षी पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे पाण्याचे भविष्यकालीन नियोजन म्हणून महापालिकेने पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात केली आहे. मात्र अनेक भागात ही कपात जवळपास ५0 टक्केच्या घरात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. कारण घणसोली, कोपरखैरणे, रबाळे या परिसरातील रहिवाशांना मागील काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. कोपरखैरणे सेक्टर १ येथील मागील अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र येथील पाणी प्रश्न सोडविण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. आता तर शहरात सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची कसरत होत आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील वसाहतींना बारवी धरणातून थेट पाणीपुरवठा होतो. परंतु एमआयडीसीने सुध्दा २५ टक्के पाणीकपात केली आहे. यातच सोमवारी शिळफाटा येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती लागली. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी तब्बल चोवीस तास लागल्याने या क्षेत्रातील रहिवाशांना तीस ते पस्तीस तास पाणीपुरवठा झाला नाही. बुधवारी सकाळी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. परंतु पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने रहिवाशांना हंडाभर पाणीसुध्दा मिळू शकले नाही. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती ओढावल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडून पाण्याचा वारेमाप वापर सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर करणाºया शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.