बापट यांच्या कंपनी भेटीची चौकशी करा
By Admin | Updated: November 12, 2015 02:06 IST2015-11-12T02:06:12+5:302015-11-12T02:06:12+5:30
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे

बापट यांच्या कंपनी भेटीची चौकशी करा
खालापूर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या डाळ उत्पादन करणाऱ्या ईटीसी अॅग्रो या कंपनीला मंगळवारी दिलेली भेट वादात सापडली आहे. बापट यांची गुढ भेट संशय निर्माण करणारी असून मुख्यमंत्र्यांनी या भेटीची चौकशी करावी अशी मागणी आ. सुरेश लाड यांनी बुधवारी खालापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. या कंपनीत जप्त करण्यात आलेला तुरडाळीचा साठा रास्तभाव धान्य दुकानांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना वाटप करावा अशी विनंतीही लाड यांनी केली आहे.
खालापूर तालुक्यातील ईटीसी या डाळ उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकून पुरवठा विभागाने २७ आॅक्टोबरला कारवाई करत ५५ कोटी रु पयांची ६ हजार टन तुरडाळ जप्त केली होती. या कंपनीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी भेट दिली मंत्र्यांचा हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. याबाबतचे वृत वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आ. सुरेश लाड यांनी खालापूरमध्ये पत्रकार परिषद घेवून तुरडाळीचे भाव गगनाला भिडलेले असताना कारवाई केलेल्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला अंधारात ठेवून अन्न पुरवठा मंत्री कंपनीची पाहणी करत असल्याने संशय निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करून गिरीश बापट कशासाठी आले होते. याचा खुलासा करून संशय दूर करावा अशी मागणी केली आहे.(वार्ताहर)