अपुऱ्या मनुष्यबळाचा पोलिसांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:07 IST2021-02-13T01:07:34+5:302021-02-13T01:07:50+5:30
४८० व्यक्तिंमागे एक पोलीस; गुन्हेगारी वाढली

अपुऱ्या मनुष्यबळाचा पोलिसांवर ताण
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत आहे. यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढत असून, गुन्हेगारांनाही मोकळीक मिळत आहे. त्यामुळे येत्या पोलीस भरतीत नवी मुंबईसाठी किती जागा भरल्या जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातली गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्राची मिळून सुमारे २२ लाखांची लोकसंख्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आहे. या लोकसंख्येसाठी पोलीसबळ मात्र केवळ ४ हजार ८०४ इतके आहे. त्यामधील सुमारे ४५० अधिकारी वगळता उर्वरित ४५०० कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आयुक्तालय क्षेत्राच्या सुमारे ९५३ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. त्यात १४४ चौ. कि. मी. चा सागरी किनारा असून, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सागरी सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आहे.
गुन्हेगारीचे बदलते स्वरूप
नवी मुंबईच्या होत असलेल्या विकासामुळे इथले गुन्हेगारीचे स्वरूपदेखील बदलत चालले आहे. यामुळे शहराबाहेरील गुन्हेगार शहरात सोनसाखळी, वाहनचोरी, दरोडे करून बाहेर पळ काढत आहेत, तर इंटरनेटच्या माध्यमातून होणारी सायबर गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे. या गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे असून बदलत्या गुन्हेगारीप्रमाणे पोलिसांनादेखील अद्ययावत होण्याची काळाची गरज आहे.
पोलिसांवर ताण
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र हे शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विभागले आहे. शिवाय शहरातील मोठमोठे प्रकल्प व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यादेखील नवी मुंबईत आहेत. तर सुमारे १४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचा सागरी किनारा आहे. ही ठिकाणे गुन्हेगारांकडून लक्ष होऊ नयेत, यासाठी पोलिसांना सतत सतर्क रहावे लागत आहे. त्याशिवाय नियमित ठरलेली कामे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास याचाही भार पोलिसांवर पडत आहे. त्यामुळे उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, यातूनच अनेकांची प्रकृतीदेखील खालावत आहे.
नवी मुंबईसाठी अधिक पोलीस बळाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात यापूर्वीच रिक्त असलेल्या सुमारे २५० जागांची माहिती शासनाला दिलेली आहे. येत्या पोलीस भरतीमध्ये आवश्यक जागा भरून निघण्याची शक्यता आहे.
- अभिजित शिवथरे,
पोलीस उपायुक्त- मुख्यालय