बेशिस्त पार्किंगला आवर घाला, वाहतूककोंडीची समस्या, प्रशासनाची अर्थपूर्ण चुप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:32 IST2017-11-06T04:32:37+5:302017-11-06T04:32:44+5:30
शहरातील बेशिस्त पार्किंगचा रहिवाशांना चांगलाच ताप होऊ लागला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

बेशिस्त पार्किंगला आवर घाला, वाहतूककोंडीची समस्या, प्रशासनाची अर्थपूर्ण चुप्पी
नवी मुंबई : शहरातील बेशिस्त पार्किंगचा रहिवाशांना चांगलाच ताप होऊ लागला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकाराला वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाºयांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनमानी पद्धतीने केल्या जाणाºया बेशिस्त पार्किंगला आळा घालण्याची मागणी स्थानिक रहिवासी व वाहनधारकांकडून केली जात आहे.
महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होऊन नियमित वाहतूककोंडी होत आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवर ही समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात रहिवाशांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेला खीळ बसताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वसाहतीअंतर्गतच्या रहदारीच्या रस्त्यांवर सम-विषम, वन साइड पार्किंग,वन वे-टू वे वाहतूक तसेच नो पार्किंग क्षेत्र आदीचे नियोजन करण्यात आले होते. अनेक भागात त्याची कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनधारकांनी आपली मनमानी सुरूच ठेवल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुईनगर तसेच नेरूळ या परिसरात ही समस्या गंभीर बनली आहे.
शहरातील बहुतांशी इमारतीमध्ये पार्किंगसाठी स्टील्टच्या जागा आहेत. परंतु या जागेवर अनधिकृत बांधकाम करून त्याचा वाणिज्य व व्यावसायिक वापर केला जात आहे. स्टील्टच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने इमारतीतील रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. त्यामुळे इमारतीच्या समोरील रस्त्यांवर नेहमीच वाहतूककोंडी होताना दिसत आहे. याची गंभीर दखल घेत इमारतीतील स्टील्टच्या जागा पार्किंगसाठी खुल्या करण्याचे आवाहन महापालिकेने सोसायटीधारकांना केले होते. परंतु शहरवासीयांनी त्यालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून सर्रासपणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याचे दिसून येते.
पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंग जैसे थे
पामबीच मार्गावरील बेकायदा पार्किंग आणि गॅरेजेसवर महापालिकेने काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई केली होती. त्यानंतर ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले होते, परंतु कारवाई थंडावताच पुन्हा या मार्गावर बिनदिक्कतपणे वाहने पार्क केली जातात. एकूणच संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे पामबीचवरील बेकायदा पार्किंग जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.
पदपथांवरील पार्किंगचा रहदारीला अडथळा
शहरातील पदपथ यापूर्वीच फेरीवाल्यांनी गिळकृंत केले आहेत. आता यात बेकायदा वाहन पार्किंगची भर पडली आहे. काही ठिकाणी पदपथांवर दुचाकी वाहने उभी केली जातात. विशेषत: गृहनिर्माण सोसायट्यांच्या समोरील पदपथांवर हा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.