जव्हारचे ‘ते’ १० नगरसेवक अपात्र
By Admin | Updated: April 15, 2015 22:56 IST2015-04-15T22:56:21+5:302015-04-15T22:56:21+5:30
या पालिकेचे १० बंडखोर नगरसेवक अपात्र ठरविण्यास पात्र असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जव्हारचे ‘ते’ १० नगरसेवक अपात्र
जव्हार : या पालिकेचे १० बंडखोर नगरसेवक अपात्र ठरविण्यास पात्र असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम १९८६ व नियम १९८७ अन्वये दाखल प्रकरणी सुनावणीमध्ये वादी व प्रतिवादी यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. वरील नमूद नियमाच्या कलम (६) प्रमाणे युक्तीवाद हे दिवाणी प्रकिया संहिता १९०८ मधील तरतूदी व विधिमंडळाच्या तरतुदींशी सुसंगत असावे लागतात. त्यामुळे प्रतिवादी यांच्या विरूध्द जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दोषारोप ठेवणे आवश्यक असल्याचा निर्णय सोमवारी दिलेला आहे.
जव्हार नगर पालिकेच्या राष्ट्रवादी कॉग्रेसपक्षाच्या १४ सदस्यांनी एकत्र येऊन नमुना ३ नियम ४ (१) भरून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदस्यत्व पत्करले असून त्याप्रमाणे गटनेत्याची निवड केली होती, दि. १९/१२/२०१४ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या १० सदस्यांनी एकत्र येऊन स्वेच्छेने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडून जव्हार विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे सदर १० सदस्य महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधि. १९८६ च्या कलम ३ (१) (ऐ) अन्वये अपात्रतेस पात्र आहेत.
महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधि. १९८६ च्या कलम ५ प्रमाणे पक्षांतराच्या कारणावरून झालेली अपात्रता विलीनी करणाच्या बाबतीत लागू होत नाही. परंतु सद्य स्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदर १० सदस्य हे दुसऱ्या कोणत्याही पक्षात सामिल झालेले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांसाठी गटनेता यांनी दि. १९/१२/२०१४ रोजी व्हीप जारी करून दि. २०/१२/२०१४ रोजीच्या सभेस हजर राहण्यास कळविले होते परंतु त्यास प्रतिवादी नगरसेवकांनी गैरहजर राहून त्याचा अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधि. १९८६ च्या कलम ३ (१) (बी) प्रमाणे अपात्र होण््यास पात्र आहेत त्यामुळे या १० नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार टांगती आहे. (वार्ताहर)