नगरसेविका मालादींच्या मृत्यूची चौकशी व्हावी
By Admin | Updated: October 7, 2015 00:22 IST2015-10-07T00:22:12+5:302015-10-07T00:22:12+5:30
नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. याकरिता त्यांनी पोलीस आयुक्त

नगरसेविका मालादींच्या मृत्यूची चौकशी व्हावी
नवी मुंबई : नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. याकरिता त्यांनी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची सोमवारी भेट घेतली. त्यांनी मालादी यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले.
मानसिक तणावात घरातून बेपत्ता झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालादी यांचा शोध सुरू असतानाच दहा दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. घरातून बाहेर जाताना त्यांनी सोबत काहीच नेले नव्हते. यामुळे त्यांचा मृतदेह दहा दिवस बेवारस म्हणून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होता. केवळ नेरुळ पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे मालादी यांच्या मृतदेहाची ओळख पटली. शशिकला मालादी ह्या आत्महत्या करतील याबाबत परिचितांना संशय आहे. आजारामुळे पती अंथरुणाला खिळून असताना त्या दोन मुलांसह संसाराचा गाडा हाकत होत्या. या दरम्यान त्यांनी अनेक संकटांचाही सामना केलेला आहे. यामुळे मानसिक तणावात त्या आत्महत्या करतील यावर त्यांच्या परिचितांचा विश्वास बसलेला नाही. त्यामुळे मालादी यांच्या मृत्यूच्या निश्चित कारणाचा तपास व्हावा अशी मागणी होत आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मालादी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून ही आत्महत्या आहे की घातपात याचा उलगडा करण्याची मागणी वाघ यांनी आयुक्तांकडे केली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनीही त्यांना सर्व बाबींचा बारकाईने तपास करून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर वाघ यांनी मयत मालादी कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी)