आॅनलाइन फसवणुकीत वाढ
By Admin | Updated: December 14, 2015 01:37 IST2015-12-14T01:37:42+5:302015-12-14T01:37:42+5:30
ई-मनीच्या वाढत्या वापरामुळे डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. कार्डधारकाचा थोडासा निष्काळजीपणा त्यांचे बँक खाते मोकळे करू शकतो.

आॅनलाइन फसवणुकीत वाढ
नवी मुंबई : ई-मनीच्या वाढत्या वापरामुळे डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढू लागले आहे. कार्डधारकाचा थोडासा निष्काळजीपणा त्यांचे बँक खाते मोकळे करू शकतो. त्याची प्रत्यक्ष झळ सोसलेल्या ५०० कार्डधारकांच्या तक्रारी चालू वर्षात सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत.
अद्ययावत तंत्रज्ञान व वाढते संगणकीकरण यामुळे आॅनलाइन शॉपिंगचा वापर वाढला आहे. त्याकरिता अनेकांनी आपल्या बँक खात्याच्या डेबिट कार्डवर आॅनलाइन खरेदीची सुविधा कार्यान्वित केलेल्या आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी ई - मनीचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे काही जण टाळतात. परिणामी त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती चोरीला जावून त्याद्वारे फसवणूकीची शक्यता असते. काही बँकेतील ग्राहकांच्या डेबिट व क्रेडिट डाटा चोरून बाहेर विकलेला असू शकतो.
बँकेच्या नावे फोन करणाऱ्या अज्ञाताला कार्डचा पिन दिल्याने झालेली फसवणूक अधिक आहे. तर काही प्रकरणात क्रेडिट कार्डची माहिती वापरून आॅनलाइन शॉपिंग करून फसवणूक होण्याचेही प्रमाण अधिक आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे चालू वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १०५३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४९४ तक्रारी डेबिट व क्रेडिट कार्डधारकांच्या आहेत. मागील तीन वर्षात अशा गुन्ह्यात दुपटीने वाढ झाली आहे. २०१२ साली १५४, २०१३ साली ३६१, २०१४ साली ५८० तर २०१५ मध्ये ४९४ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर सेलला यश आलेले आहे. मात्र बहुतांश
गुन्हे राज्याबाहेरील टोळ्यांकडून झालेले आहेत. त्यांच्यापर्यंत पोचण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे खबरदारी हाच उपाय असल्याचे पोलिसांकडून डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)