बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी

By Admin | Updated: September 2, 2016 03:57 IST2016-09-02T03:57:34+5:302016-09-02T03:57:34+5:30

गणेशोत्सवासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष

Increasing demand for Bappa's ornaments | बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी

बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी

- प्राची सोनवणे, नवी मुंबई

गणेशोत्सवासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. घरातला बाप्पा असो वा मंडळातला प्रत्येक गणेशभक्तांना मूर्ती सजविण्याची हौस असते आणि तीच हौस पूर्ण करण्यासाठी हल्ली बाजारात विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याने व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत सुरु आहे.
लाडक्या बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पहायला मिळते. भाविकांना मनाजोगे दागिने उपलब्ध व्हावेत याकरिता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दागिने खरेदीचा जोर तसा कमी झाल्याने बाप्पासाठी सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडविलेले दागिने, हुबेहूब सोन्यासारखे दिसणाऱ्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. बाप्पांची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यास मंडळांचे अधिक प्राधान्य दिसून येत आहे.
चांदीचा पत्रा तयार करून मूर्तीच्या मापानुसार संबंधित दागिन्याचे कच्चे नक्षीकाम करण्यात येते. पेन्सिलने तयार केलेले हे नक्षीकाम चांदीच्या पत्र्यावर चिटकविले जाते. लाख, खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने अंतिम नक्षीकाम तयार केले जात असल्याची माहिती व्यापारी दिनेश मेहता यांनी दिली. मूर्ती सजविण्यासाठी मोत्यांची माळ, डायमंड ज्वेलरी तसेच इकोफ्रेंडली बाप्पासाठी कागदापासून तयार केलेले दागिने, फुलांपासून तयार केलेल्या माळांचा वापर केला जात आहे.

दागिन्यांचे प्रकार
विविध ज्वेलर्स ब्रॅण्डने बाप्पाचे उपरणे, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, उंदीर आदी प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील. मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगण, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जाणवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप आदींना वाढती मागणी आहे.

Web Title: Increasing demand for Bappa's ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.