पनवेल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ

By Admin | Updated: May 26, 2016 02:58 IST2016-05-26T02:58:57+5:302016-05-26T02:58:57+5:30

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत

Increase in house rent in Panvel area | पनवेल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ

पनवेल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ

पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत जवळपास १८ ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न करण्यात आला आहे. परिसरातील वाढत्या घरफोड्या व चोऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांची वाढती दहशत ही सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याची आहे. पोलिसांनी चोरट्यांचे आव्हान स्वीकारून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून चोऱ्या व घरफोड्यांना लगाम घालावा, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस अपयशी ठरल्याचे सद्य:स्थितीवरून दिसत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवडाभरात आकुर्ली येथे ३ ठिकाणी, विचुंबे येथील प्रयाग सोसायटीमध्ये ९ ठिकाणी, आदई येथे सत्यज्योत, पुष्पविनायक, ओमकार ब्रम्हा अशा ५ ठिकाणी तसेच आकुर्ली मालेवाडी येथील आदिवासी मुलांच्या होस्टेलच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाइल, दप्तर चोरी करून नेले आहेत. त्यामुळे परिसरात घरफोड्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी लोकसंख्या जवळपास लाखाच्या घरात आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या आणि सोनसाखळी, वाहन चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. परिस्थितीवर देखरेख किंवा येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकसंख्या या परिसरात आसपास राहण्यासाठी आली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकापूर, आकुर्ली, विचुंबे आदी भागात जवळपास १८ हून अधिक घरफोड्यांचा प्रयत्न झाला आहे. मात्र केवळ २ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सभा घेणे गरजेचे
दोन तीन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे होणाऱ्या चोऱ्या व घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. यावेळी खांदेश्वर पोलिसांनी शहरात नागरिकांना सावधानतेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाळगण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र घरफोड्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागल्याने अशा सभा पुन्हा घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Increase in house rent in Panvel area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.