PM मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेच्या सभामंडप, सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण
By कमलाकर कांबळे | Updated: January 9, 2024 19:25 IST2024-01-09T19:25:43+5:302024-01-09T19:25:56+5:30
खारघर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांवर भर

PM मोदींच्या सभेसाठी दीड लाख क्षमतेच्या सभामंडप, सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर हा कार्यक्रम होणार आहे. जवळपास दीड लाख लोकांची उपस्थिती गृहीत धरून या ठिकाणी सभामंडप आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विशेषत: आरोग्यविषयक सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन या सर्व सुविधांचा आढावा घेतला.
एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतूचे यावेळी पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार आहेत तसेच याच वेळी महिला सशक्तीकरणाचाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यासाठीची आसन व्यवस्था, परजिल्ह्यातून येणारी आणि स्थानिक वाहनांचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि खाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांचे नियोजन तसेच आरोग्यविषयक सुविधा आदींवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जात आहे. गेल्या वर्षी खारघर येथे झालेल्या सोहळ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: वैद्यकीय सुविधांवर अधिक भर दिला जात आहे. जिल्हा आरोग्य उपसंचालकांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कार्यक्रम स्थळावर निर्माण केल्या जात असलेल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतल्याचे समजते.
सागरी सेतूसह विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात एमटीएचएल या सागरी सेतूच्या लोकार्पणासहीत एमएमआरडीएच्या इतर प्रकल्पांचेही लोकार्पण होणार आहे. तसेच नवी मुंबई मेट्रो, खारकोपर -उरण रेल्वे आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला सुमारे दीड लाख लोक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार भव्य मंडप, आसन व्यवस्था, मान्यवरांसाठी व्यासपीठ तयार केले जात आहे. मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर नव्याने डांबरीकरण केले जात आहे. ही सर्व कामे करण्याकरिता पनवेल व नवी मुंबई महापालिका, सिडको महामंडळ, एमएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सरकारी संस्थांवर जबाबदारी सोपवली आहे.