नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही
By नामदेव मोरे | Updated: January 16, 2024 17:01 IST2024-01-16T16:59:52+5:302024-01-16T17:01:11+5:30
नवी मुंबईकरांना गणेश नाईक यांचे आश्वासन; दर्जेदार सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध.

नवी मुंबईत २० वर्षे पाणी, घरपट्टी वाढ नाही, आता पुढच्या २० वर्षांतही करवाढ नाही
नामदेव मोरे, नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षांत करवाढ केलेली नाही. पुढील २० वर्षेही ती केली जाणार नसल्याचे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले.
नवी मुंबई विमानतळामुळे उपलब्ध होणारी विकासाची संधी या विषयावरील परिषदेमध्ये गणेश नाईक यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. नवी मुंबईने स्वच्छतेमध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पूर्ण केले आहेत. २० वर्षे करवाढ न करता मनपाने दर्जेदार विकासकामे केली आहेत. प्रशासकीय काळात करवाढ करण्याचा विचार होता, पण ती केली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे करवाढ टळल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योजकांना आवश्यक ते सहकार्य करून व्यवसाय वृद्धीला पोषक वातावरण तयार करून दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येही दर्जेदार विकासकामे यापुढेही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मंदा म्हात्रे, आयाेजक विनय सहस्रबुद्धे, सतीश निकम, माजी आमदार संदीप नाईक, नीलेश म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेला महाविद्यालयीन युवकांसह उद्योग क्षेत्रामधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांविषयी माहिती दिली.