सामाजिक संघटनांसह बचतगटांचे महत्त्व वाढले
By Admin | Updated: April 23, 2017 03:47 IST2017-04-23T03:47:56+5:302017-04-23T03:47:56+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच परिसरामधील सामाजिक, धार्मिक, प्रांतवार सामाजिक संघटना व बचतगटांचे महत्त्व वाढले आहे. मतदारांना आकर्षित

सामाजिक संघटनांसह बचतगटांचे महत्त्व वाढले
- नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेल महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच परिसरामधील सामाजिक, धार्मिक, प्रांतवार सामाजिक संघटना व बचतगटांचे महत्त्व वाढले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढविण्यास सुरवात केली असून मोठ्या गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वही वाढले आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त ३० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी अगोदरच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कडक उन्हाळा व मतदारांचे होणारे स्थलांतर यामुळे प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. प्रत्येक मतदाराला भेटून मतदान करण्याचे आवाहन करण्याबरोबरच समूह स्वरूपात जास्तीत जास्त मते मिळविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळेच प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागामधील सामाजिक संघटना, गणेशोत्सवपासून क्रीडा व तरूण मित्र मंडळ, बचत गट, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाषावर व जाती, धर्मनिहाय संघटना या सर्वांशी संपर्क वाढविण्यास सुरवात झाली आहे. काही उमेदवार हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अशा इच्छुकांनी यापूर्वी संघटनांना केलेल्या मदतीचे उदाहरण देवून व यापुढे काय मदत करणार याविषयी आश्वासने देण्यास सुरवात केली आहे. सामाजिक संघटनांकडून त्यांच्याकडील पनवेल परिसरातील विविध भागात, प्रभागात राहणाऱ्यांचे नाव, पत्ते, मोबाइल क्रमांक मिळविण्यास सुरवात झाली आहे. माथाडी कामगार संघटनांसह इतर संघटनांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बचत गटांची व त्यांच्या सदस्यांची यादी मिळविण्यासही सुरवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विचारणा होत असल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा भावही वधारला आहे.
निवडणुकांमध्ये एक मताला महत्त्व असते. नवी मुंबईमधील वाशीमध्ये काँगे्रसच्या महिला उमेदवाराचा फक्त एक मताने पराभव झाला होता. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सीवूडमधील शिवसेना उमेदवार समीर बागवान यांचा फक्त तीन मतांनी पराभव झाला होता. इतर अनेक ठिकाणी अत्यंत कमी फरकाने अनेक उमेदवारांचा पराभव झाला होता. यामुळे पनवेल महापालिका निवडणुकीमधील सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक मतदाराची सविस्तर माहिती मिळविण्यास सुरवात केली आहे.
मतदारांचे मूळ गाव, त्यांचा कोणत्या सामाजिक संघटनांशी संबंध आहे का यापासूनचा तपशील संकलित केला जात आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेलेल्या मतदारांना २४ मे रोजी कसे मतदानासाठी आणता येईल याचेही आडाखे बांधले जात असून यासाठी सामाजिक संघटना व इतरांचीही मदत घेतली जात आहे.
जेवढी ताकद तेवढी मदत
सामाजिक संघटनांशी जवळीकता वाढविण्याबरोबर त्यांच्यावर मदतीचा वर्षाव सुरू झाला आहे. कोणत्या संघटनेची किती ताकद आहे हे पाहून त्यांना मदतही केली जात आहे. या मदतीच्या मोबदल्यात निवडणुकीसाठी मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. याशिवाय त्यांच्याकडून मतदारांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक मिळविण्यावर लक्ष केंद्रित झाले आहे.
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
- सामाजिक संघटनांकडून त्यांच्या सदस्यांची यादी व संपर्क क्रमांक मिळविण्यास सुरवात
- बचत गटातील सदस्यांची सविस्तर माहिती संकलन करण्याची तयारी
- भाषा व प्रांतवार संघटनांकडून पाठिंब्यासाठी प्रयत्न
- संघटनांच्या माध्यमातून उन्हाळ्यात गावी जाणाऱ्या मतदारांना आणण्याची रणनीती