उद्यान विकासातील असमतोल थांबणार
By Admin | Updated: July 27, 2016 03:29 IST2016-07-27T03:29:27+5:302016-07-27T03:29:27+5:30
महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील उद्यान विकासामध्ये पक्षपात झाला आहे. २०० पैकी १३२ उद्याने फक्त वाशी, नेरूळ व बेलापूर या तीन परिसरात आहेत. तुर्भे, दिघा व घणसोलीमधील

उद्यान विकासातील असमतोल थांबणार
- नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेच्या स्थापनेपासून शहरातील उद्यान विकासामध्ये पक्षपात झाला आहे. २०० पैकी १३२ उद्याने फक्त वाशी, नेरूळ व बेलापूर या तीन परिसरात आहेत. तुर्भे, दिघा व घणसोलीमधील नागरिकांसाठी पुरेशी उद्यानेच उभारलेली नाहीत. हा असमतोल कमी करण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई सुनियोजित शहर म्हणून ओळखले जाते. परंतु प्रत्यक्षात शहराचे नियोजन फसले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने वाशी, नेरूळ व बेलापूर परिसरामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सार्वजनिक सुविधांचे भूखंड राखीव ठेवले आहेत. तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरामध्ये अत्यावश्यक सुविधांसाठीही मोकळे भूखंड ठेवलेले नाहीत. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.
सर्वाधिक उद्याने असलेले शहर म्हणून नवी मुंबई ओळखली जाते. सद्यस्थितीमध्ये २०० उद्याने आहेत. परंतु यामधील १३२ उद्याने वाशी, नेरूळ व सीबीडी विभाग कार्यालयाच्या परिसरात आहेत. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या दिघामध्ये फक्त एक उद्यान आहे. एपीएमसीसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या तुर्भेमध्येही एक उद्यान आहे. पामबीच रोडसह पूर्ण सानपाडामध्ये फक्त १० उद्याने आहेत. सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या कोपरखैरणेमध्ये २१ उद्याने आहेत. यामध्ये एकही मोठे उद्यान नाही. घणसोली व ऐरोलीमध्येही हीच स्थिती आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांचे क्षेत्रफळ ७.६२ चौरस मीटर आहे. पालिकेची सर्व मोठी उद्याने नेरूळ परिसरामध्ये आहेत. ३५ कोटी रूपये खर्च करून उभारलेले वंडर्स पार्क, संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारामधून बांधलेले रॉक गार्डन, आर. आर. पाटील स्मृती उद्यान तीनही नेरूळमध्येच आहेत. याशिवाय पामबीचवरील ज्वेल्स आॅफ नवी मुंबई म्हणून ओळख असलेली वॉटर बॉडीही नेरूळमध्येच आहे.
सीबीडीमध्ये मँगो गार्डन, वाशीमध्ये मिनी सिशोर व इतर अनेक चांगली उद्याने आहेत. परंतु वाशी सोडल्यानंतर दिघापर्यंत एकही भव्य उद्यान नाही. ऐरोलीमध्ये २८ उद्याने आहेत. परंतु त्यामध्येही एकही मोठे उद्यान नाही. यामुळे कोपरखैरणे ते दिघामधील नागरिकांना सुटीच्या दिवशी नेरूळमध्ये जावे लागत आहे. तुर्भे, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे व घणसोलीमधील माथाडी परिसरामध्ये अत्यंत छोटी उद्याने आहेत. जुईनगर परिसरात फक्त एक उद्यान असून चिंचोली तलावाचे सुशोभीकरण केल्यामुळे तेथेही नागरिकांना बसता येते. उद्यान विकासामधील हा असमतोल दूर करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहेत. भविष्यात जिथे उद्यान नाहीत तेथे ती उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
पामबीचही दुर्लक्षित
नवी मुंबईमध्ये पाचबीच रोडवर भव्य टॉवर उभारले आहेत. परंतु या परिसराला सिमेंट काँक्रीटचे जंगल म्हणून ओळखले जावू लागले आहे. सानपाडा ते सीवूडपर्यंत या परिसरामध्ये एकही उद्यान नाही.
आयुक्तांची
ठाम भूमिका
नेरूळमध्ये ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाअंतर्गत काही नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे परिसरात उद्यान विकसित करण्याची मागणी केली. यावर मुंढे यांनी सांगितले की, आपल्याकडे वाशी, नेरूळ व बेलापूरमध्ये खूप उद्याने आहेत. परंतु तुर्भे,घणसोली, दिघा परिसरामध्ये खूपच कमी उद्याने आहेत. यामुळे यापुढे उद्यान उभारणीसाठी त्या परिसरांना प्राधान्य दिले जाईल असे सांगून विकासाचा बॅकलॉग थांबविण्याचे सूचित केले आहे.
श्रीमंत वसाहतींत भव्य उद्याने
उद्यान विकसित करताना पक्षपात करण्यात आला आहे. नेरूळ पूर्वला श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वसाहत आहे. या परिसरामध्ये शहरातील तीनही भव्य उद्याने आहेत. इतर उद्यानांची स्थितीही चांगली आहे. दुसरीकडे नेरूळ पश्चिमेला अल्प उत्पन्न गटातील नागरिक राहात असल्याने तेथे उद्यानासाठी कमी जागा दिली आहे. हीच स्थिती कोपरखैरणे व तुर्भे परिसरात आहे.
विरंगुळ्यासाठी जागाच नाही
शहरामध्ये ५० हजार पेक्षा जास्त झोपडीधारक असून तेथील लोकसंख्या अडीच लाखांवर गेली आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये झोपडपट्टीमध्ये एकही उद्यान नाही. गरिबांची वसाहत असलेल्या झोपडपट्टीमधील रहिवाशांना खेळण्यासाठी व विरंगुळ्यासाठी एकही जागा नसल्याची खंत इंदिरानगरमधील शिवसेना पदाधिकारी महेश कोठीवाले यांनी व्यक्त केली आहे.
जुईनगरवर नेहमीच अन्याय
सिडको नोडपैकी जुईनगर परिसरावर नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. या परिसरामध्ये सद्य:स्थितीमध्ये फक्त एक उद्यान आहे. त्याचे क्षेत्रफळही जेमतेम ३०० ते ४०० चौरस मीटर आहे. दुसरे उद्यान चिंचवली तलावाच्या बाजूला विकसित केले आहे. परंतु ते स्वतंत्र उद्यान नसून तलावाचा भाग आहे. उद्यानांचा बॅकलॉग भरण्याची मागणी येथील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी केली आहे.