पनवेलमधील पूरस्थितीचे देखाव्यातून चित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 02:14 AM2019-09-06T02:14:14+5:302019-09-06T02:14:34+5:30

रोडपालीतील गणेश मंडळाचा उपक्रम : पोस्टरच्या माध्यमातून मांडले वास्तव

 An illustration of the flood scene in Panvel | पनवेलमधील पूरस्थितीचे देखाव्यातून चित्रण

पनवेलमधील पूरस्थितीचे देखाव्यातून चित्रण

Next

कळंबोली : वाढते नागरीकरण, भविष्यात होऊ घातलेले प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. या माध्यमातून एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे शहरात पुराचे संकट उभे राहिले आहे. रोडपालीतील एका गणेश मंडळाने शहरातील पूरस्थितीचा आढावा आपल्या देखाव्यातून मांडला आहे.

मुंबई आणि कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलचा झपाट्याने विकास झाला आहे. या शहराला महानगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरी वस्तीबरोबरच नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. मोठमोठ्या इमारती या भागात उभ्या राहिलेल्या आहेत, प्रशस्त रस्ते, मोठमोठे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. यामुळे पनवेल बदलले असले तरी या परिसरावर पुराची टांगती तलवार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल शहर आणि कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अनेकांचे एकदा नव्हे, तिनदा नुकसान झाले. या सर्व गोष्टींचा विचार करून यंदा कळंबोलीतील सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने रोडपालीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पनवेलच्या पूरस्थितीचा पोस्टरद्वारे देखावा साकारण्यात आला आहे. यात पनवेलची भौगोलिक स्थिती, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या गाढी, कासाडी, उलवे, काळुंद्रे नद्या, देहरंग, मोरबे, ओवे धरणांचेही विवरण पोस्टर्सच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

पूरस्थितीला कारणीभूत गोष्टी
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत, त्यामुळे पावसाच्या पाण्याला अडवून त्याचा निचरा करता येत नाही. कांदळवनेही नष्ट करण्यात आले आहेत. एन एच ४ वर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता आठ मीटर उंचीचा हजार हेक्टर जमिनीवर भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल शहर आणि सिडको वसाहती नैसर्गिकदृष्ट्या खाली राहिल्या आहेत. परिणामी, या भागांत पाणी साचत आहे.

Web Title:  An illustration of the flood scene in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.