पोलीस चौकीसमोर अवैध वाहतूक
By Admin | Updated: March 30, 2015 00:22 IST2015-03-30T00:22:00+5:302015-03-30T00:22:00+5:30
वाशीतील वाहतूक पोलीस चौकीसमारून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. एस. टी. महामंडळाच्या थांब्यावर खाजगी बसेस व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत.

पोलीस चौकीसमोर अवैध वाहतूक
नवी मुंबई : वाशीतील वाहतूक पोलीस चौकीसमारून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. एस. टी. महामंडळाच्या थांब्यावर खाजगी बसेस व इतर वाहने उभी करण्यात येत आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला असून या समस्येकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करू लागले आहेत.
नवी मुंबईमध्ये सर्वाधिक वाहतुकीची समस्या वाशी परिसरात निर्माण झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतूक चौकी सुरू करण्यात आली आहे. पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी रोडवर उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून दंड वसुलीकडे जास्त लक्ष देत आहेत. यामध्येही व्यावसायिकांना अभय देवून सर्वसामान्यांवर कारवाई होत आहे. पोलीस चौकीसमोर एस.टी. चा थांबा आहे.
या थांब्यावर खाजगी बसेस उभ्या राहू लागल्या आहेत. त्याचा परिणाम एस. टी. च्या उत्पन्नावर होत आहे. अनेक वेळा या थांब्यावर कार उभ्या करण्यात येत आहेत. रिक्षाही याच ठिकाणी उभ्या असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होवू लागली आहे. खाजगी जीप व ट्रॅक्सही येथे उभ्या राहू लागल्या आहेत. वाहतूक पोलिसांसमोर अनागोंदी कारभार सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कोणी आक्षेप घेतल्यास दाखविता यावी यासाठी कारवाई दाखविली जात आहे.
अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याकडे पोलीस दुर्लक्ष करू लागले आहेत. पोलीस चौकीसमोर वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारी करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांची नाराजी वाढत आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु सुटी असल्याने अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.